उदगीरच्या समतानगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचा प्रशासनाला विसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:09+5:302020-12-12T04:36:09+5:30
उदगीर : शहरातील समतानगर मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून सातत्याने रेल्वे फाटक बंद होत असल्याने तासन्तास वाहतुकीचा ...

उदगीरच्या समतानगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचा प्रशासनाला विसर!
उदगीर : शहरातील समतानगर मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून सातत्याने रेल्वे फाटक बंद होत असल्याने तासन्तास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे समतानगर व संतोषीमातानगरातील नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग उभारण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते; परंतु त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
उदगीरमधील रेल्वेस्थानकाच्या जवळपास ३०० मीटर अंतरावर समतानगर आहे, तसेच उदगीर शहराला जोडणाऱ्या भागावर दक्षिण मध्य रेल्वेचे फाटक आहे. या रुळावरून प्रवासी व मालवाहतुकीच्या रेल्वेगाड्यांची सतत ये-जा असते. त्यामुळे येथे रेल्वे येण्याअगोदर किमान १५ मिनिटे रेल्वेचे फाटक बंद करण्यात येते. समतानगर, संतोषीमातानगर, डॅम रोड, गोपाळनगर, क्रांतीनगर, नेत्रगाव, येणकी, मानकी, देवणी या भागांत जाणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे.
समतानगर, गोपाळनगर, रेल्वे स्टेशनसमोरील भाग, संतोषीमातानगर, क्रांतीनगर आदी भागांत उदगीर शहरातील किमान २० टक्के नागरी वसाहत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी या भागातील नागरिकांनी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी करून विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन स्थानिक प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांच्यात बैठक झाली आणि रेल्वे गेटच्या पलीकडे असलेला भुयारी मार्ग स्थानिक प्रशासनाने मोकळा करण्याचे व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करणे व इतर मदत रेल्वे खात्याने पुरविण्याचे ठरले.
मात्र, निवडणुका होऊन एक वर्ष झाले तरी स्थानिक प्रशासन व रेल्वे प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक प्रशासन व रेल्वे खात्याने लवकरात लवकर भुयारी मार्ग मोकळा करून द्यावा. जेणे करून या मार्गावर होणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
केवळ सर्व्हे करण्यात आला...
विधानसभा निवडणुकीवेळी केवळ सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर कुठलीही कार्यवाही झाली नाही. आमदार अथवा खासदार फंंडातून काही आर्थिक तरतूद झाल्यास त्या ठिकाणी भुयारी मार्ग करणे शक्य होईल.
- बस्वराज बागबंदे, नगराध्यक्ष.
इच्छाशक्तीचा अभाव...
राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रश्न प्रलंबित आहे. स्थानिक राजकीय मंडळी, खासदारांनी पाठपुरावा केल्यास हे काम होईल, अन्यथा या भागातील नागरिकांची या त्रासातून सुटका होणे शक्य नाही, असे रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.
-------------------------------