लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता जिल्हाधिकाऱ्यांनी कडक अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे. रात्रीच्या संचारबंदीत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना हजार रुपयांचा दंड, तर विनामास्क आढळल्यास ५०० रुपयांचा दंड लावला जाणार आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोविड-१९ व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा ७२ तासांच्या आत शोध घेणे व पुढील वैद्यकीय कार्यवाही करण्याचेही निर्देश आहेत.
वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळून अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींकडून एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास हजार रुपयांचा दंड, पूर्वनियोजित लग्न, त्याअनुषंगिक समारंभ ५० व्यक्तींच्या मर्यादेत व्हावेत. तेही स्वगृही व्हावेत, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सर्व खाजगी कार्यालये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उद्योग क्षेत्रातील उत्पादने, कोविड नियमांचे पालन करून पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. मात्र, त्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे.
प्रवेशद्वारावर थर्मल गणद्वारे तपासणी करण्यात यावी. प्रवेशद्वारावर अन्य व्यवस्था असाव्यात. मास्क व शारीरिक अंतर नियमांचे पालन होणे आवश्यक आहे, असेही आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.
होम आयसोलेशनसाठी असे आहेत निर्बंध...
होम आयसोलेशनची परवानगी घ्यायची झाल्यास संबंधित रुग्णाचा वैद्यकीय पाठपुरावा करणाऱ्या डाॅक्टरांची माहिती स्थानिक प्रशासनास दिल्यानंतरच परवानगी मिळेल.
होम आयसोलेशन झालेल्या घराच्या अग्रगण्य भागावर १४ दिवस होम क्वारंटाइन असे फलक स्थानिक स्वराज्य संस्थेने लावावेत. त्यावर होम आयसोलेशनचा कालावधी नमूद करणे आवश्यक.
होम आयसोलेशन झालेल्या पाॅझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच घराबाहेर फिरण्यास प्रतिबंध असेल.
हाेम आयसोलेशनसंदर्भातील प्रस्तुत निर्बंधाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णास तात्काळ निर्धारित केलेल्या जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येईल.