देवर्जन प्रकल्पाच्या पाळूवर झाडे-झुडपे वाढल्याने भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:52+5:302021-06-17T04:14:52+5:30
देवर्जन मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे स्वतंत्र असलेले कार्यालय उदगीरहून लातूर येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर ...

देवर्जन प्रकल्पाच्या पाळूवर झाडे-झुडपे वाढल्याने भीती
देवर्जन मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे स्वतंत्र असलेले कार्यालय उदगीरहून लातूर येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर देवर्जन येथे या प्रकल्पाचे शाखा कार्यालय सुरू करण्यात आले. ३० सप्टेंबर १९९३ मध्ये जिल्ह्यात भूकंप झाल्यानंतर भूकंप -पुनर्वसन योजनेच्या सिंचन कार्यालयाकडून या प्रकल्पाची व कॅनॉलची नाममात्र डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकल्पाकडे सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या पाळूवर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत. या वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे प्रकल्पाला धोका होण्याचा संभव नाकारता येत नाही. याशिवाय, देवर्जन गावातील नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. देवर्जन प्रकल्पाच्या पाळूवर वाढलेली झाडे-झुडपे प्रकल्प पाण्याने भरण्याअगोदर काढण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रप्रकाश खटके व सरपंच सुनीता खटके यांनी सिंचन विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.
तालुक्यासाठी एकच जेसीबी...
उदगीर तालुक्यातील प्रकल्पाच्या पाळूवर वाढलेली झाडे-झुडपे काढण्यासाठी सिंचन विभागाकडून एकच जेसीबी मशीन उपलब्ध झाली आहे. देवर्जन मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर वाढलेली झाडे-झुडपे काढण्यासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे देवर्जनचे शाखा अभियंता एस.एम. निटुरे यांनी सांगितले.