यंदाच्या रबी हंगामात पेऱ्याबरोबर हरभऱ्याचे उत्पादन वाढले आहे. दरम्यान, नाफेडच्या वतीने आधारभूत खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीस सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत १६ हजार १२३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. राशीनंतर बाजार समितीत हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बाजारपेठेत विक्री केली. आगामी काळात आणखीन दर वाढेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली. परंतु, केंद्र सरकारने काही निर्बंध कमी केल्याने अचानकपणे हरभऱ्याचे दर कमी होऊन प्रति क्विंटलला ४ हजार ६०० रुपयांपर्यंत भाव मिळू लागला.
दरम्यान, आधारभूत खरेदी केंद्राची मुदत संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने हरभरा खरेदीस मुदतवाढ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि खरेदी केंद्राकडे ओढा वाढला आहे.
जिल्ह्यातील १६ केंद्रावर आतापर्यंत ४ हजार ७०० शेतकऱ्यांची ९० हजार क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.
५० कोटींची खरेदी...
जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ७०० शेतकऱ्यांच्या ९० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. बाजारपेठेत दर कमी झाल्याने नोंदणी केलेले शेतकरी आपला शेतमाल केंद्राकडे आणत आहेत. आतापर्यंत जवळपास ५० कोटी रुपयांची खरेदी झाली असून चालू खरेदीतील जवळपास ८ कोटी रक्कम थकित राहिली आहे, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय.ई. सुमठाणे यांनी सांगितले.
ढगाळ वातावरणामुळे धास्ती...
खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैश्यांची जुळवाजुळव करीत आहेत. बाजारपेठेच्या तुलनेत आधारभूत केंद्रावर अधिक भाव असल्याने शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. याशिवाय, ढगाळ वातावरणामुळे पाऊस होऊन हरभरा खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.