शेतकरी कन्या संपदाचा युपीएससीत झेंडा; वर्तमानपत्र, पुस्तकांनी प्रगल्भता; जीवनाला दिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 23:48 IST2025-04-22T23:47:56+5:302025-04-22T23:48:24+5:30

संपदा वांगे म्हणाल्या, आजोबा हरिश्चंद्र हरिदास यांची प्रेरणा मोलाची होती. शेतकरी वडील धर्मराज वांगे, प्राथमिक शिक्षिका असणारी आई निर्मला यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद यशमार्गावर नेणारे ठरले...

Farmer's daughter's estate flag in UPSC; Newspapers, books provide depth; direction to life | शेतकरी कन्या संपदाचा युपीएससीत झेंडा; वर्तमानपत्र, पुस्तकांनी प्रगल्भता; जीवनाला दिशा

शेतकरी कन्या संपदाचा युपीएससीत झेंडा; वर्तमानपत्र, पुस्तकांनी प्रगल्भता; जीवनाला दिशा

लातूर : रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी येथील शेतकरी धर्मराज वांगे यांची कन्या संपदा यांनी मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यशाचा झेंडा रोवला. नरवटवाडीची जिल्हा परिषद शाळा ते पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज असा शिक्षण प्रवास असणाऱ्या संपदा यांनी पानगावच्या सरस्वती विद्यालयात, लातूरच्या गोदावरीदेवी लाहोटी शाळेत आणि बारावीपर्यंतचे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयात पूर्ण केले आहे.

राज्यशास्त्रात पदवी, पदव्युत्तर शिक्षण, सेट-नेट उत्तीर्ण आणि आता एमएसडब्ल्यू करणारी संपदा म्हणाल्या, मी ठरवून युपीएससीकडे वळले. दहावीला ९८ टक्के गुण होते. स्वाभाविकच वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणाकडे बहुतेकांचा कल असतो. परंतु, मला माझे वडील धर्मराज वांगे, प्राथमिक शिक्षिका असणारी आई निर्मला हरिदास वांगे यांनी पूर्णपणे शैक्षणिक स्वातंत्र्य दिले. त्यांच्या पाठबळामुळेच मला कला शाखा निवडता आली. माझा रँक ८३९ आहे. अधिक रँक मिळण्यासाठी आणखी प्रयत्न करेन.

इकिगाई अन् लोकमत...
शाळेत असताना इकिगाई पुस्तक हाती पडले. त्याचा माझ्या व्यक्तिमत्वावर प्रभाव आहे. लोकमत आणि इतर वर्तमानपत्रेही मी नियमित वाचत असे. वाचनाने प्रगल्भता येते. आयुष्याला दिशा मिळते. वाचन विद्यार्थ्यांना योग्य ट्रॅकवर नेणारे ठरते, असे संपदा वांगे यांनी आवर्जून सांगितले. परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी इतकेच सांगेन की, त्यांनी स्वत:कडे तटस्थपणे पहावे. कोण आपल्याला कसे क्रिटिसाईज करतो, इतरांचा फिडबॅक काय, याकडे न पाहता स्वत:वर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

आई-वडिलांचे आशीर्वाद...
संपदा वांगे म्हणाल्या, आजोबा हरिश्चंद्र हरिदास यांची प्रेरणा मोलाची होती. शेतकरी वडील धर्मराज वांगे, प्राथमिक शिक्षिका असणारी आई निर्मला यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद यशमार्गावर नेणारे ठरले. लहान भाऊ श्रीनिवास अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. आम्ही एकत्र कुटुंबात वाढलाे. काका दिवंगत अड. शिवराज वांगे, काकू ज्याेती वांगे, काका माधव वांगे, बालासाहेब वांगे यांचाही संपदा यांनी आवर्जून उल्लेख केला.

कृष्णा पाटील १९७ रँक; सुशिल गित्ते ६२३ रँक...
लातूर जिल्ह्यातून कृष्णा बब्रुवान पाटील कोदळीकर यांनी १९७ रँक मिळवून युपीएससीत यश मिळविले आहे. तर सुशिल गित्ते ६२३ तर संपदा वांगे यांचा ८३९ रँक आहे.

Web Title: Farmer's daughter's estate flag in UPSC; Newspapers, books provide depth; direction to life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.