लातूर तालुक्यात वाळलेल्या उसात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:18 IST2018-11-13T12:14:58+5:302018-11-13T12:18:42+5:30
या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़.

लातूर तालुक्यात वाळलेल्या उसात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर : वाळून गेलेला ऊस, तीन महिन्यावर आलेले मुलीचे लग्न, हाताला कामही नाही़. झालेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून लातूर तालुक्यातील सारसा येथील भूजंग पवार या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़.
गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सारसा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची हालक्या जमीनीवरील उस वाळून गेले आहे़. सारसा येथील भूजंग माणिकराव पवार (वय ४५) यांना तीन एकर शेती आहे़ त्यांनी यावर्षी ऊसाची लागवड केली होती़. पाणी नसल्याने उसाची पाचट झाली़ मुलीचे लग्न जमवून तारीखही काढली होती़. फेब्रुवारी महिन्यात मुलीचे लग्न करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करावी, याची त्यांना चिंता लागली होती़ उसही वाळून गेल्याने खर्च कसा भागवायचा हा प्रश्न होता़ त्यातच हाताला कामही नसल्याने घरखर्च भागविणेही कठीण झाले होते़.
दुष्काळी परिस्थितीत झालेली नापिकी व कर्ज कसे फेडायचे यातून त्यांनी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नातेवाईकांनी सांगितले़. याबाबतची माहिती मुरूड पोलिसांना देण्यात आली असून सकाळी १०़३० वाजेपर्यंत प्रेत काढण्यात आले नव्हते़ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय प्रेत काढू नका, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे़.
हाताला कामही नाही़...
पाऊस नसल्याने या भागात मजुरांना कामेही नाहीत़ भूजंग पवार हे मुलीच्या लग्नासाठी पैसे कोठून जमवायचे या चिंचेत होते़ उसाचीही पाचट झाल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़. घटनास्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेख यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत़.