मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार; दाेन जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: December 1, 2023 23:07 IST2023-12-01T23:07:15+5:302023-12-01T23:07:35+5:30
लातूर जिल्ह्यातील ममदापूर येथील घटना...

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार; दाेन जखमी
औराद शहाजानी (जि. लातूर) : शेताकडे गाडीवाटेवरून निघालेल्या बारावर्षीय बालकावर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. हा प्रकार शेजारून जात असलेले शेतकरी विश्वभंर सिद्राम बिराजदार यांच्या लक्षात आला. त्यांनी मुलाला वाचविण्यासाठी पुढे गेले असता, त्यांच्यावरही मधमाश्यांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले, उपचारासाठी घेऊन जाताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली. यामध्ये जखमी झालेला मुलगा आणि आजाेबावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निलंगा तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी विश्वभंर सिद्राम बिराजदार (वय ६५) हे शुक्रवारी सकाळी शेताकडे जात हाेते. दरम्यान, वाटेत अचानक माेहाेळाच्या माश्यांनी हल्ला केल्याने साेन्या अनंत म्हेत्रे (वय १२) हा वाचवा...वाचवा... असे ओरडत हाेता. हा आवाज कानी पडताच विश्वभंर सिद्राम बिराजदार हे त्याला वाचवण्यासाठी जवळ गेले असता, मधमाश्यांनी त्यांचावरही जाेरदार हल्ला केला. जवळच शेतात असलेले मुलाचे आजाेबाही धावत आले. मधमाश्यांनी त्यांच्यावरही जाेरदार हल्ला केला. यामध्ये शेतकरी विश्वभंर बिराजदार हे गंभीर जखमी झाले. त्यांनी आपल्या मुलाला फाेन करून मधमाश्यांच्या हल्यात जखमी झाल्याचे सांगितले.
उपचारासाठी त्यांना कासार बालकुंदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, डाॅक्टरांनी तपासणी करून मृत घाेषित केले. दरम्यान, दाेन्ही जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माराेती जनार्धन बिराजदार यांनी दिलेल्या माहितीवरून कासार सिरसी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.