राजकुमार जाेंधळे / लातूर : दळवेवाडी (ता. चाकूर) येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, दळवेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी केशव सिताराम होळे (वय ४०) यांच्या नावावर पावणेदोन एकर कोरडवाहू शेती आहे. यंदाच्या हंगामात शेतात त्यांनी कापसाचा पेरा घेतला हाेता. सततची नापिकी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे ४८ हजारांचे कर्ज होते. दरम्यान, कर्ज परतफेडीसाठी बँकेकडून वारंवार तगादा लावण्यात येत होता. त्यातच मुलीचे लग्न कसे करावे? या आर्थिक विवंचनेत ते होते. बँकेकडून लावण्यात येणारा सततचा तगादा, नापिकीला कंटाळून त्यांनी शुक्रवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात उद्धव सिताराम होळे यांनी दिलेल्या माहितीवरून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.