लातूर महापालिकेत बनावट नियुक्ती आदेश प्रकरण; पोलिसांकडून 'मास्टरमाईंड'चा शोध सुरू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:10 IST2025-12-10T13:07:29+5:302025-12-10T13:10:13+5:30
माहिती अधिकारात विचारणा केल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

लातूर महापालिकेत बनावट नियुक्ती आदेश प्रकरण; पोलिसांकडून 'मास्टरमाईंड'चा शोध सुरू !
लातूर : लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर करून तब्बल सहा जणांना 'लिपिक' पदाचे खोटे नियुक्ती आदेश देण्यात आल्याची धक्कादायक माहिती, माहिती अधिकार कायद्यातून उघडकीस आल्यानंतर बनावट आदेश देणारा सूत्रधार कोण याचा तपास शिवाजीनगर पोलिसांनी सुरू केला आहे.
शुभम बाळासाहेब गरड, ज्ञानेश्वरी रवी गरड, मारुती भगवान शिवणे, आदित्य बंकट भिंगे, सोमनाथ लक्ष्मण पांचाळ आणि बापूराव कोंडीराम हुडे या सहा अर्जदारांनी स्वतःला मिळालेले 'लिपिक' पदाचे नियुक्ती आदेश अधिकृत आहेत की नाहीत, याबाबत माहिती अधिकारात विचारणा केली होती. यावर महापालिकेने शहानिशा केली असता, हे सर्व आदेश पूर्णपणे बनावट असून, ते मनपा प्रशासनाकडून कधीही जारी झालेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे. या गैरप्रकारात महापालिकेतील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग नसल्याचेही मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता ३ डिसेंबर रोजीच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
तपासासाठी मूळ कागदपत्रांची मागणी
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या तक्रारीसोबत पोलिसांना सध्या केवळ बनावट नियुक्ती आदेशाची छायांकित प्रत मिळाली आहे. मूळ कागदपत्रे पोलिसांना अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. मूळ कागदपत्र तपासासाठी महत्त्वाची आहेत. मूळ कागदपत्र प्राप्त होताच गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.