अनुदानातून तीन महसूल मंडळे वगळल्याने शिवसेनेचा रास्तारोको
By हरी मोकाशे | Updated: October 3, 2022 17:43 IST2022-10-03T17:41:49+5:302022-10-03T17:43:13+5:30
सरसकट २५ हजारांची मदत देण्याची केली मागणी

अनुदानातून तीन महसूल मंडळे वगळल्याने शिवसेनेचा रास्तारोको
बेलकुंड (जि. लातूर) : औसा तालुक्यातील उजनी,बेलकुंड व मातोळा ही महसूल मंडळे अतिवृष्टी,गोगलगायीचा प्रादुर्भाव आणि संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाच्या यादीतून वगळल्याने ही महसूल मंडळ नव्याने यादीत समाविष्ट करण्यात यावीत. तसेच सर्व शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे,या मागणीसाठी सोमवारी औसा-तुळजापूर महामार्गावरील टोल नाक्याजवळ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन माजी आमदार दिनकरराव माने यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, तालुकाप्रमुख सतीश शिंदे, पप्पू कुलकर्णी, संजय उजळंबे, संदीपान शेळके, आबासाहेब पवार, विनोद माने, सुरेश भुरे, योगिराज पाटील, सतीश काकडे, सोसायटी चेअरमन बाबुराव लोखंडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी,गोगलगायींचा प्रादुर्भाव आणि संततधार पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी मदत जाहीर केली. यात औसा तालुक्याला चांगली भरपाई मिळाली. मात्र तालुक्यातील बेलकुंड,उजनी व मातोळा या तीन महसूल मंडळाचा समावेश नाही. या तिन्ही मंडळांचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी हे आंदोलन झाले. राज्य सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.