संयम पाळून कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांना जिंकायची आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:44+5:302021-01-01T04:14:44+5:30
नववर्षाच्या पूर्वसंध्येला संवाद साधताना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख म्हणाले, सरते वर्ष आरोग्याच्या दृष्टीने सर्वांसाठीच संकटाचे ठरले. त्यास ...

संयम पाळून कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांना जिंकायची आहे
नववर्षाच्या पूर्वसंध्येला संवाद साधताना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख म्हणाले, सरते वर्ष आरोग्याच्या दृष्टीने सर्वांसाठीच संकटाचे ठरले. त्यास आपण सर्वांनीच धीराने तोंड दिले. येणाऱ्या वर्षाचे स्वागत करताना धार्मिक स्थळासह कोठेही अधिकची गर्दी करू नये. पर्यावरणपूरक आनंद साजरा करावा. घरी राहूनच सर्वांनी नववर्षारंभाच्या सदिच्छा एकमेकांना द्याव्यात, असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.
सरत्या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लातूरकरांनी सदैव प्रशासनाला साथ दिली. आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळली आहे. नियमांचे पालन केले आहे. त्यामुळे साथ नियंत्रणास राहण्यास मदत झाली. येणाऱ्या वर्षातही योग्य ती खबरदारी घेऊन प्रगतीच्या दिशेने जावे लागेल, असेही पालकमंत्री देशमुख म्हणाले.
पुरातन विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश...
शहरातील पुरातून विहिरींचे पुनरुज्जीवन करावे, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत. ते म्हणाले, शहरालगत असलेल्या सर्व ओढ्यांचे, नाल्यांचे खोलीकरण करून ते स्वच्छ करण्यात यावेत. तसेच प्राचीन विहिरीही पुनरुज्जीवित कराव्यात. या संदर्भात गुरुवारी विशेष बैठक घेण्यात आली. दरम्यान, शहरात नाल्यांच्या बाजूने सायकल तसेच वाॅकिंग ट्रॅक बांधाव्यात, अशा सूचनाही दिल्या.