नऊ वर्षांत आठ हजार सापांना दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:17+5:302021-08-25T04:25:17+5:30
अहमदपूर : साप म्हटले की प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप होतो. मात्र, प्रत्यक्षात साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून, गेल्या नऊ ...

नऊ वर्षांत आठ हजार सापांना दिले जीवदान
अहमदपूर : साप म्हटले की प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप होतो. मात्र, प्रत्यक्षात साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून, गेल्या नऊ वर्षांत विविध जातींच्या आठ हजार सापांना पकडून सुरक्षितस्थळी सोडण्याचे काम शेलदरा येथील सर्पमित्र सिध्दार्थ काळे व महेंद्र गायकवाड हे करत आहेत. हजारो सापांना पकडून जीवदान दिलेच, त्याचबरोबर अनेक लोकांच्या घरी जाऊन सर्प पकडून अनेकांचे प्राण वाचविल्याचे समाधान आहे, अशा भावना सर्पमित्रांनी व्यक्त केल्या.
सर्पमित्र सिध्दार्थ काळे व महेंद्र गायकवाड या युवकांनी २०१२ पासून अहमदपूर, जळकोट, कंधार, मुखेड या चारही तालुक्यांमध्ये जाऊन घरामध्ये, किंवा शेतात, वस्तीत, अनेक सर्प पकडले आहेत. आजपर्यंत घोनस, फुरशे, नाग, मण्यार व पोवळा या पाचही विषारी सापांना व निमविषारी हरणटोळ मांजऱ्या व बिनविषारी धामण, तस्कर, कुकरी, दिवड, धूळनागीन, कवड्या, वाळा, काळतोंड्या, मांडुळ, डुरक्याघोनस,
रसेलकुकरी, पटेरीकवड्या या सापांना पकडून जंगलात, वनात सोडून जीवदान दिले आहे. गावात, घरात सर्प आला आहे, असा फोनवरून निरोप मिळताच हे सर्पमित्र एकमेकांना संपर्क करून कोणत्याही क्षणी साप पकडण्यासाठी धावून जातात. साप पकडल्यानंतर अनेक लोक स्वईच्छेने या सर्पमित्रांना प्रवास खर्चाला पैसे देतात. परंतु, ही जमा होणारी रक्कम संकलित करून ते अनाथ आश्रमाला आर्थिक मदत देतात. शासनाने सर्पमित्रांची दखल घेऊन सर्प पकडण्यासाठी लागणारे साधन किंवा किटचा पुरवठा करावा, अशी मागणी सर्पमित्र
सिध्दार्थ काळे व सर्पमित्र महेंद्र गायकवाड यांनी केली.
दंश केल्यास तत्काळ उपचार घ्यावेत...
सापाने दंश केल्यावर जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा दवाखान्यात उपचार करणे गरजेचे आहे. निसर्गाचा समताेल राखण्यासाठी निसर्ग अन्नसाखळीत सापांचे महत्त्व आहे. त्यामुळे साप दिसताच तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांनी केले आहे.