सव्वा वर्षानंतर खाद्यतेल स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:18+5:302021-06-24T04:15:18+5:30

सोयाबीन, शेंगदाणा, पाम तेलाच्या दरात घसरण. संग्राम होनराव लोकमत न्यूज नेटवर्क चापोली : कोविड काळात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव ...

Edible oil cheaper after 15 years; Consolation to all | सव्वा वर्षानंतर खाद्यतेल स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

सव्वा वर्षानंतर खाद्यतेल स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

सोयाबीन, शेंगदाणा, पाम तेलाच्या दरात घसरण.

संग्राम होनराव

लोकमत न्यूज नेटवर्क

चापोली : कोविड काळात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, गत तीन दिवसांपासून खाद्यतेलाच्या भाववाढीला काही प्रमाणात ‘ब्रेक’ लागला आहे. शेंगदाणा, सोयाबीन, पामतेलाच्या दरात काहीअंशी घसरण झाली आहे. शेंगदाणा तेलाचे भाव प्रतिकिलो १० रुपयाने, तर सोयाबीन तेल ३५ रुपयांनी घसरले. भाव कमी झाल्याने गृहिणींना काहीअंशी का असेना दिलासा मिळाला आहे.

मार्च २०२०पासून कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच स्तरातील नागरिकांवर महागाईचा भडिमार झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, आयात करावर दोन्ही देशांनी लावलेले आयात-निर्यात शुल्क, परदेशात कमी झालेले उत्पन्न, कामगारांचे प्रश्न, कोरोनाच्या संकटामुळे सर्वाधिक आयात यासह विविध कारणांमुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. किरकोळ बाजारात या किमतीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे खाद्यतेल २०० रुपये किलोपर्यंत विकले गेले. आता खाद्यतेलाचे भाव गेल्या तीन दिवसांपासून कमी होत आहेत. शेंगदाणा तेल १०, सोयाबीन तेल ३५, पामतेल ३०, करडी तेल १० रुपयांनी कमी झाले आहे. मात्र, सूर्यफूल तेलाच्या भावात घट झालेली नाही.

दिवसेंदिवस तेलाच्या दरात घसरण येणार...

सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये दरवाढ झाली होती. त्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले. अशात ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी होत आहे. कमोडिटी बाजारात झालेली घसरण व तेलबिया आयातीचा घेतलेला निर्णय यामुळे खाद्यतेलाचे दर घसरत आहेत. येत्या काही दिवसांमध्येही दरात आणखी घसरण होणार असल्याचे तेल विक्रेत्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल...

पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या घरी खाद्यतेल हे घरचे असायचे. ते खाद्यतेलासाठी शेतात सूर्यफूल, करडई, शेंगदाणा यासारखे तेलपीक घेतल्यानंतर घरीच घाण्याचे तेल काढले जात होते. हेच तेल खाद्यतेलासाठी वापरले जात होते. मात्र, आता सद्यस्थितीत मजुरांचा तुटवडा त्यामुळे खुरपणी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी हे तण नाशकाची फवारणी करत असल्याने सूर्यफूल, करडई, तेलबिया आदी पिके आंतरपीक म्हणून घेणे टाळत असल्याने घरी तेल तयार करणे बंद झाले आहे.

Web Title: Edible oil cheaper after 15 years; Consolation to all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.