निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आली, नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन
By संदीप शिंदे | Updated: August 21, 2023 16:44 IST2023-08-21T16:43:16+5:302023-08-21T16:44:53+5:30
नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन

निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आली, नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन
वलांडी (जि.लातूर) : देवणी तालुक्यातील इस्लामवाडी येथे कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. तिरुपती व्यंकटराव अंकुलगे (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
देवणी तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी उशीरा झालेली पेरणी आणि त्यानंतर गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यातच पाऊस नसल्याने शेतातील पीक हातून जात आहे. तिरुपती अंकुलगे यांना दोन एकर शेती असून, गेल्या दोन वर्षांपासून शेतीचे उत्पन्न घटले होते. त्यामुळे रोजंदारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मुलीच्या लग्नासह घरप्रपंच चालविण्यासाठी त्यांना खासगी कर्ज काढावे लागले होते.
नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत त्यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वलांडी येथील प्राथमिक अरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ लामतुरे करीत आहेत.