मुसळधार पावसाने झाेडपले ! निलंगा तालुक्यात शेकडाे हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By राजकुमार जोंधळे | Updated: September 10, 2022 17:53 IST2022-09-10T17:52:27+5:302022-09-10T17:53:51+5:30
निलंगा तालुक्यात गत आठ दिवसांपासून कमीअधिक पावसाने हजेरी लावली आहे.

मुसळधार पावसाने झाेडपले ! निलंगा तालुक्यात शेकडाे हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लातूर : गत तीन दिवसांपासून निलंगा तालुक्यातील गावांना मुसळधार पावसाने झाेडपून काढले आहे. गुरुवारी, शुक्रवार आणि शनिवारी सकाळी झालेल्या झालेल्या मुसळधार पावसाने हलगरा, औराद शहाजानी, तगरखेडा, तांबरवाडी, हालसी तुगाव, शेळगी, माळेगाव, सावरी, काेयाजीवाडी, राजेवाडी, हणमंतवाडी, तळीखेड, सिरसी हंगरगा, माकणी थाेर, अनसरवाडा आदी गावच्या शिवारातील शेकडाे हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर काही ठिकाणी खरिपाची पिके पाण्यात आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी झालेल्या दमदार पावसाने शेडाेळ-तुपडी मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प होती.
निलंगा तालुक्यात गत आठ दिवसांपासून कमी अधिक पावसाने हजेरी लावली आहे. हलगरा गावातील रस्त्यावरही पाणीच पाणी वाहत हाेते. दरम्यान, पावसाचे पाणी हलगरा येथील रस्त्यालगतच्या घरामध्ये शिरले. मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. परिणामी, नदी, नाल्यांना पूर आला असून, गावातील रस्त्यावरून गुडघ्याएवढे पाणी वाहत होते. हलगरा गावालगत असलेल्या ओढ्याला पूर आल्याने शेत शिवारात गेलेले अनेकजण ओढ्याच्या पलीकडे अडकले. तर हलगरा गावातील सखल भागात पावसाचे पाणीच पाणी साचले आहे हाेते.
शेतशिवारात पाणीच...पाणी...
गत चार दिवसापासून हलगरा परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शेत शिवारात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकरवरील खरीप पीके पाण्यातच असल्याने हंगामच धोक्यात आला आहे.
सावरी, जामगा, साेनखेडचा पूल गेला वाहून...
निलंगा तालुक्यातील सावरी ते जामगा आणि सावरी ते साेनखेड मार्गावर असलेले दाेन पूल पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. परिणामी, या मार्गावरील वाहतूक सध्याल ठप्प झाली आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने खरिपाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तीन दिवसांपासून धो...धो...पाऊस...
निलंगा शहरासह तालुक्यातील काही गावांना पुन्हा शनिवारी मुसळधार पावसाने झाेपपले आहे. दरम्यान, माकणी थाेर परिसरातील शेतजमिनीची अवस्था वाइट झाली आहे. काही भागात पावसाच्या पाण्याने जमीनच पूर्णत: खरवडून गेली आहे.