पावसामुळे पेरणीची लगबग, खत तुटवड्याने धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:39+5:302021-06-16T04:27:39+5:30
तालुक्यातील शेतकरी खरिपासाठी हंगामपूर्व कामे आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत होते. यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने ...

पावसामुळे पेरणीची लगबग, खत तुटवड्याने धावाधाव
तालुक्यातील शेतकरी खरिपासाठी हंगामपूर्व कामे आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत होते. यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दरम्यान, मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यापासून कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असून पेरणीची लगबग सुरू केली आहे. पेरणीवेळी शेतकरी डीएपी आणि १२:३२:१६ या खताचा वापर करतात. त्यामुळे या खताला सध्या सर्वाधिक मागणी आहे. परंतु, सदरील खत उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
या खतासाठी देवणी शहरासह वलांडी, जवळगा अशा मोठ्या गावांतील शेतकरी कृषी सेवा केंद्रावर सातत्याने हेलपाटे मारत आहेत. परंतु, विक्रेत्यांकडून खत उपलब्धतेसंदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. कधी उपलब्ध होईल, हेही विक्रेते निश्चितपणे सांगत नाहीत.
सध्या तालुक्यात दररोज पाऊस होत आहे. त्यामुळे पेरणीयोग्य स्थिती निर्माण झाली असून काही शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवातही केली आहे. परंतु, खत न मिळालेले शेतकरी संकटात सापडले आहेत. खताविना यंदा पेरा करावा लागणार की, काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
कृषी विभागाचे अधिकारी हतबल...
सदरील खताच्या टंचाईबाबत येथील प्रमुख विक्रेते एक- दोन दिवसांत खताची रॅक उपलब्ध होईल आणि पुढील आठवड्यात खत प्राप्त होईल, असे सांगत आहेत. दरम्यान, कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पसंतीचे डीएपी व अन्य ठरावीक खत सध्या उपलब्ध नाही. केव्हा उपलब्ध होईल, हेही सांगता येत नाही, असे म्हणत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सोयाबीन बियाणेही महागले...
तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होतो. यंदा सोयाबीन बियाणांच्या बॅगचा दर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उसनवारी करून बियाणे खरेदी करीत आहेत. परंतु, रासायनिक खत मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची धावाधाव सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. याशिवाय, गतवर्षीच्या खरीप हंगामाचा पीकविमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.