घाबरू नका, सतर्क रहा! लातूरला अतिवृष्टीसोबतच सप्टेंबर महिन्यातला तिसरा भूकंपाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 20:05 IST2025-09-27T20:05:04+5:302025-09-27T20:05:25+5:30
लातूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; बोरवटी येथे २.२ रिश्टर स्केलची नोंद

घाबरू नका, सतर्क रहा! लातूरला अतिवृष्टीसोबतच सप्टेंबर महिन्यातला तिसरा भूकंपाचा धक्का
लातूर : ३० सप्टेंबर १९९३च्या विनाशकारी भूकंपाची आठवण ताजी असताना, सप्टेंबर महिन्यात लातूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवण्याची मालिका सुरूच आहे. २६ सप्टेंबर २०२५ रोजी, सकाळी साधारण ६.३० वाजण्याच्या सुमारास लातूर तालुक्यातील बोरवटी येथे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोरवटी येथील या भूकंपाची नोंद २.२ रिश्टर स्केल इतकी झाली आहे. हा धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा असला तरी, जिल्ह्यामध्ये वारंवार होणाऱ्या या नोंदींमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वारंवार होणारे भूकंपाचे धक्के
२३ सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यातील मुरुड अकोला येथे रात्री सव्वाआठ वाजता २.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का नोंदवला गेला होता. २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता निलंगा तालुक्यातील हासोरी, बडूर, उस्तुरी परिसरातही सौम्य धक्के जाणवले होते. यापैकी हासोरी येथे २४ सप्टेंबर २०२५ रोजी २.४ स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात ६ सप्टेंबर २०२२ पासून आतापर्यंत १४ वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
सप्टेंबर महिन्यातच भूकंपाचे धक्के
वारंवार जाणवत असल्यामुळे ३० सप्टेंबर १९९३ मध्ये किल्लारी परिसरात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाची आठवण पुन्हा एकदा जागी झाली आहे. अतिवृष्टीच्या संकटासोबतच भूकंपाचे संकट तर नाही ना, अशी शंका भयभीत झालेल्या स्थानिक नागरिकांच्या मनात येत आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातला हा तिसरा धक्का आहे.
प्रशासनाचे आवाहन; घाबरू नका, सतर्कता बाळगा
भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून लातूर शहरांमध्ये आणि जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती आहे. दररोज कुठे ना कुठे अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीचे संकट असताना पुन्हा भूकंपाचे संकट येणार तर नाही ना? अशी शंका मनात येत असल्याने नागरिक भयभीत आहेत. मात्र प्रशासनाने घाबरण्याचे कारण नाही, सतर्क रहा, असे आवाहन केले आहे.
सुरक्षित राहण्यासाठी अशी घ्या खबरदारी
भूकंप होत असताना किंवा झाल्यानंतर लागलीच अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कच्च्या घरात किंवा जुन्या इमारतीत राहत असाल, तर तत्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जा. जवळच्या सुरक्षित पक्क्या घरात किंवा भूकंपरोधक इमारतीत तात्पुरता आसरा घ्या. टेबल, पलंग किंवा मजबूत फर्निचरच्या खाली आश्रय घ्या. खिडक्या, काचेच्या वस्तू किंवा भिंतीपासून दूर रहा. विजेचे मुख्य स्विच बंद करा.
भूकंपानंतर काय करावे
जखमींना मदत करा : जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करा आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवा.
तपासणी करा : गॅस, पाणी आणि वीज यांच्या लाइनची तपासणी करा आणि काही नुकसान झाले असल्यास संबंधित विभागाला कळवा.
अफवा टाळा : सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका.
आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासनाशी किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधावा.