धनेगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरला; एका दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग
By संदीप शिंदे | Updated: September 13, 2022 16:59 IST2022-09-13T16:58:44+5:302022-09-13T16:59:08+5:30
पाच दिवसांपासून पावसाची संततधार : परिसरातील सिंचनाचा प्रश्न मार्गी

धनेगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरला; एका दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग
वलांडी (जि.लातूर) : देवणी तालुक्यात गेल्या पाच दिवसापासुन पावसाची संततधार सुरु आहे. या पावसाने धनेगाव उच्चस्तरीय बँरेज पुर्णक्षमतेने भरला असून, बंधाऱ्याचे अतिरिक्त पाणी एक दरवाजा उघडून मांजरा नदीपात्रात सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.
आतापर्यंत धनेगाव बँरेजमध्ये ८ मीटर पाणीसाठा झाला आहे. पाण्याचा येवा सुरुच असल्याने बँरेजचा एक दरवाजा ३० सेंमीने उचलून मांजरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर खालच्या बाजुस असलेल्या होसुर येथील बंधााऱ्याचेही पाणी सोडण्यात आल्याची माहिती बँरेजचे उपविभागीय अभियंता सुनिल मुळे यांनी दिली.
गेल्या पाच दिवसापासुन पाऊस सुरु असल्याने तालुक्यातील नदी, नाले वाहते झाले आहेत. तर नेवनदी व मानमोडी नदीलाही पाणी आले आहे. तालुक्यातील साठवण तलाव, पाझर तलावात पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यावर्षी जुनच्या शेवटी खरीपाच्या पेरण्या झाल्या. बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीनंतर पिकाची उगवण चांगली असताना या कोवळ्या पिकावर गोगलगायने हल्ला चढवत पिके नष्ट केली. आता अति पावसाने पिके पिवळी पडत असून, असाच पाऊस सुरु राहिला तर शेतकऱ्यांच्या शेतातील पिके हातची जाण्याची चिंता व्यक्त केली जात असून, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आठपैकी चार साठवण तलाव शंभर टक्के...
देवणी तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असून, तालुक्यातील आनंदवाडी, लासोना, वडमुरंबी, वाघदरी हे चारही साठवण तलाव शंभर टक्के भरले आहेत. तर उर्वरित दवनहिप्परगा, अनंतवाडी, बोरोळ, गुरनाळ साठवण तलाव ९० टक्के भरले असल्याची माहिती वलांडी पाटबंधारे सिंचन शाखेचे अभियंता राहुल जाधव यांनी दिली.
डोंगरगाव बंधाऱ्यांतूनही पाण्याचा विसर्ग...धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यात आठ मी. पाणीसाठा झाला असून, धरण क्षेत्राच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यातून पाण्याचा टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येत असल्याचे उपविभागीय अभियंता सुनील मुळे यांनी सांगितले.