बुधवारी संध्याकाळपर्यंत उदगीरच्या कोविड रुग्णालय व शहरात ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर एकूण रुग्णांची संख्या ३३ इतकी झाली आहे. रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झाला नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उदगीर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. एप्रिल महिन्यात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. उपचारासाठी शहरातील काही खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली होती. त्यातच खुल्या बाजारात रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. खासगी रुग्णालयात बेड व ऑक्सिजनची कमतरता दिसून आली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला एकाच दिवसात आतापर्यंतची ५६६ एवढी सर्वोच्च बाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर आतापर्यंत कोविड रुग्णालयात २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५४ रुग्णांचा एप्रिल महिन्यात तर मे महिन्यात आतापर्यंत ८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची नोंद आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात आरोग्य विभाग, महसूल विभागाच्या मदतीने अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून पालिका प्रशासन, पोलीस अधिकारी, कर्मचारी, कोविड रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी, आरोग्य विभाग या सर्वांनी वेगवेगळ्या उपाययोजना करून आपापली जबाबदारी योग्य रीत्या पार पाडली असल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रिया..
बाधित रुग्ण संख्या कमी होत असल्याचे दिसत असले तरी जनतेने सावध राहिले पाहिजे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. -प्रवीण मेंगशेट्टी, उपजिल्हाधिकारी
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. त्यासोबतच १८ वर्षांवरील दिव्यांगांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नाेंदवावा. -डॉ. प्रशांत कापसे, तालुका आरोग्य अधिकारी
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याबरोबर तपासणी करून घ्यावी. जेणेकरून हा आजार गंभीर होण्यापासून टाळता येईल. येणाऱ्या काळात अनलॉकची प्रक्रिया झाल्यानंतर सर्वच बाजारपेठा खुल्या होतील. त्यावेळी जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे . मास्क व सॅनिटायजरचा वापर केलाच पाहिजे सोबतच लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनतेनी चांगले सहकार्य केले आहे. ऑक्सिजनसाठी मागणी नोंदवली आहे. येत्या दोन दिवसात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झालेला असेल. भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच ही साथ आटोक्यात आणून अनेक अनेकांचे जीव वाचण्यास त्यांची मदत झाली. सर्वच लोकप्रतिनिधी यांनी चांगल्याप्रकारे सहकार्य केले. डॉ. शशिकांत देशपांडे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, उदगीर