रणरणत्या उन्हात पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:34 IST2019-05-13T18:32:40+5:302019-05-13T18:34:19+5:30
नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा नातेवाईकांचा आरोप

रणरणत्या उन्हात पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्धाचा मृत्यू
निलंगा (जि. लातूर) : शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक पाणी भरण्यासाठी गेले असता चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१३) दुपारी घडली. याबाबत नातेवाईकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी महेबुबपाशा अब्दुल करीम सौदागर (६०) हे १३ मे रोजी परिसरातील बोअर बंद असल्याने दुसऱ्या प्रभागातून पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जागेवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून, यातच आमच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नगरपालिकेकडे केली आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले, पोलीस स्टेशन परिसरात पाण्याअभावी बोअर बंद पडला आहे. मात्र या भागात दिवसातून दोनवेळा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय चार दिवसाला एकदा नळाद्वारे पाणी दिले जात आहे.