CoronaVirus : दिलासादायक ! पुणे, मुंबईतून लातुरात आलेले ९५ टक्के लोक निरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:53 PM2020-04-07T17:53:53+5:302020-04-07T17:56:15+5:30

सर्दी असलेल्या लोकांचे प्रमाण केवळ दीड टक्के

CoronaVirus: Ninety five percent of the population in Latur from Pune, Mumbai is healthy | CoronaVirus : दिलासादायक ! पुणे, मुंबईतून लातुरात आलेले ९५ टक्के लोक निरोगी

CoronaVirus : दिलासादायक ! पुणे, मुंबईतून लातुरात आलेले ९५ टक्के लोक निरोगी

Next
ठळक मुद्देकोरोना पार्श्वभूमीवर सर्व्हेक्षणकिरकोळ आजारी रूग्णांवर उपचाऱ़़

- आशपाक पठाण 

लातूर : कोरोना विषाणूच्या भितीपोटी पुणे, मुंबई, हैद्राबाद येथून लातूर जिल्ह्यात एकुण ६६ हजार ३०७ नागरिक आले आहेत़ पुणे, मुंबईत पहिल्या टप्प्यात कोरोनाचे रूग्ण वाढल्याने अनेकांनी गावाकडचा मार्ग धरला़ मात्र, इथे आल्यावर प्रशासनाकडून घरोघरी जाऊन कोठून किती लोक आले, त्यांना कुठला आजार, व्यसन आहे का? याचा सर्व्हे करण्यात आला़ यातून ९५़५२ टक्के लोक निरोगी असल्याचे समोर आले आहे़ तर उर्वरित लोकांना किरकोळ सर्दी, खोकला, बीपी, शुगर, ताप आदी प्रकारचा त्रास आहे़

मुंबई, पुण्यात कोरोनाचा फैलाव अधिक झाल्याने त्याठिकाणी वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांनी गावाकडचा मार्ग धरला़ मार्च महिन्यात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक लोक पुणे येथून आले आहेत़ त्यापाठोपाठ मुंबई आणि हैद्राबादचा क्रमांक लागतो़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करताच पुन्हा लोकांनी भितीपोटी गाव जवळ केले़ ग्रामीण भागात बाहेरून आलेल्या लोकांपासून संसर्ग होण्याची भिती बळावल्याने प्रशासनाने आशा स्वंयसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांकडून सर्व्हेक्षण केले़ प्रत्येकाच्या घरी जाऊ आशा स्वंयसेविकांनी घरात आलेली नवीन व्यक्ती, कोठून आली, त्यांना कुठला आजार आहे का याचे सर्व्हेक्षण केले़ याशिवाय, त्यांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबाबतचा सल्लाही देण्यात आला़ सर्व्हेक्षणात १ एप्रिलपर्यंत एकुण ६६ हजार ३०७  लोक लातूर जिल्ह्यात आल्याची नोंद झाली आहे़ यातील ९५़६२ लोकांना कुठलाही आजार नसून ते सर्वजण तंदुरूस्त आहेत़

४़३८ टक्के लोकांना विविध आजार
कोरोनाच्या भितीपोटी गावाकडे आलेल्या एकुण ६६ हजार ३०७ लोकांपैकी ९५़६२ टक्के तंदुरूस्त आहेत़ तर उर्वरित ४़३८ टक्के लोकांना सर्व्हेक्षण करीत असताना सर्दी, ताप, शुगर, बीपी आदी आजाराची लक्षणे असल्याचे समोर आले आहेत़ यात ताप ०़५२़ तीव्र खोकला ०़२०, श्वसनास त्रास होणे ०़०३, थकवा येणे ०़५६, अंगदुखी ०़५०, डायबिडीज ०़०३, उच्च रक्तदाब (बीपी) ०़०६, शुगर ०़०८, दमा ०़०२, टीबी (क्षयरोग) ०़०२,  कॅन्सर ०़०२, दारू, तंबाखूचे व्यसन ०़६१ व ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयोमानानुसार होणारा त्रास असलेली ०़२२ टक्के लोक आहेत़ यातील बहुतांश रूग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आल्याने ताप, खोकला, सर्दी आदी आजारातून ते बरेही झाले आहेत़

किरकोळ आजारी रूग्णांवर उपचाऱ़़
सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा येणे आदी प्रकारच्या त्रास आढळून आलेल्या रूग्णांना सर्व्हेक्षण करीत असताना लागलीच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले़ त्याठिकाणी संबंधितांवर उपचार करण्यात आले आहेत़ बाहेरगाावाहून आलेल्या लोकांचा सर्व्हे करण्यात आला असून त्यात ९५़६२ टक्के लोक निरोगी आढळले आहेत़ उर्वरित लोकांवरही उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गंगाधर परगे यांनी दिली़

Web Title: CoronaVirus: Ninety five percent of the population in Latur from Pune, Mumbai is healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app