CoronaVirus : लातूरमधील एका गावात कोरोनाचे २० रुग्ण!, परिसर केला सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 18:30 IST2021-07-27T18:30:13+5:302021-07-27T18:30:48+5:30
CoronaVirus : माळुंब्रा गावाची लोकसंख्या ७५० आहे. बहुतांश जणांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. शेतकरी विमा भरण्याच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. अशातच १५ जुलैपासून कोरोनाचे रुग्ण गावात आढळले.

CoronaVirus : लातूरमधील एका गावात कोरोनाचे २० रुग्ण!, परिसर केला सील
बेलकुंड (ता. औसा, जि. लातूर) : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असताना अचानक औसा तालुक्यातील माळुंब्रा गावात तब्बल २० रुग्ण आढळले आहेत. यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य पथक दाखल झाले आहे. दरम्यान, गावाचा काही परिसर सील करण्यात आला आहे.
माळुंब्रा गावाची लोकसंख्या ७५० आहे. बहुतांश जणांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. शेतकरी विमा भरण्याच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. अशातच १५ जुलैपासून कोरोनाचे रुग्ण गावात आढळले. २५ व २६ जुलै या दोन दिवसांत गावात १३ रुग्ण आढळले. आता ही संख्या २० वर गेली आहे. दरम्यान, औश्याच्या तहसीलदार शोभा पुजारी यांनी गावात कंटेनमेंट झोन तयार केले असून, आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून गावात कोरोना चाचण्या वाढविल्या आहेत.
त्याचबरोबर लसीकरणही करण्यात येत आहे. २० रुग्णांपैकी ५ रुग्णांना बुधवारी १४ दिवस पूर्ण होत आहेत. त्यांना सुटी मिळण्याची शक्यता असून, उर्वरित १५ रुग्णांवर उपचार बारा नंबर पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.