लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 21:07 IST2021-05-21T21:06:17+5:302021-05-21T21:07:17+5:30
महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शून्य ते १८ वयोगटातील १७७पैकी १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत
लातूर : महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शून्य ते १८ वयोगटातील १७७पैकी १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोविड आजारामुळे पालक गमावलेल्या या बालकांचे संगोपन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.
संजय गांधी निराधार योजना तसेच बालकल्याण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पालक गमावलेल्या बालकांना तत्काळ बालसंगोपन व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ देण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व पोर्टलवर अपडेट झालेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची माहिती जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने घेतली असून, पोर्टलवर अपडेट न झालेल्या ४०० व्यक्तींची यादी आरोग्य विभागाकडून घेऊन त्यात अशा बालकांचा शोध घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी समितीला दिले.
कोविड आजारामुळे मृत्यू होऊन अनाथ झालेल्या बालकांची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी, जेणेकरून अशा बालकांना शासनाकडून मदत देऊन त्यांचे संगोपन करणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे सोयीचे होणार आहे, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.या बैठकीला जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपाचे आयुक्त अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, प्रोबेशनरी सहाय्यक जिल्हाधिकारी जिथीन रहेमान, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, वर्षा पवार, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष व्यास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, पोलीस अधीक्षक प्रिया पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार...
शून्य ते १८ वयोगटांतील बालकांवर कोठे अत्याचार होत असेल तर त्याविषयी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८वर तक्रार करता येईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.