मराठा आरक्षणासाठी हिप्परगा येथे चूल बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 18:36 IST2023-09-11T18:36:27+5:302023-09-11T18:36:45+5:30
हिप्परगा क. गावात जवळपास ५०० घरे आहेत.

मराठा आरक्षणासाठी हिप्परगा येथे चूल बंद आंदोलन
बेलकुंड (जि. लातूर) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणासाठी औसा तालुक्यातील हिप्परगा (क.) येथील ग्रामस्थांनी सोमवारी गाव बंद व चूल बंद आंदोलन करीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
अंतरवाली सराटी येथील आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सरपंच संतोष गाेरे, चेअरमन व्यंकट पाटील, राजेंद्र क्षीरसागर, बाळू पाटील, राम धानुरे, महेश नन्नवरे, गोविंद दातके, सुधाकर काटे, भैरवनाथ फुलसुंदर, दिगंबर नन्नवरे, भागवत नन्नवरे, राम पाटील, बाबूराव नन्नवरे, बाळासाहेब गोरे, जयराम जगताप, कृष्णा पाटील, महादेव पाटील, गंगाबाई काटे, पार्वतीबाई गोरे, सोजरबाई पाटील, सुमनबाई नन्नवरे यांच्यासह गावातील अबालवृध्द सहभागी झाले होते.
हिप्परगा क. गावात जवळपास ५०० घरे आहेत. गावातील सर्वजण आंदोलनात सहभागी होऊन गावातून रॅली काढली. घोषणा देत ही रॅली गावातील हनुमान मंदिरात आली. त्यानंतर तिथे शाहीरांचे पोवाडे गाण्यात आले. देवीचा जागरण गोंधळ घालण्यात आला. गावातील अबालवृध्दांनी मंदिराच्या प्रांगणात बसून दिवसभर उपोषण केले. दिवसभर गावातील चूल बंद ठेवण्यात आली होती.