सरकारच्या निर्णयामुळे ‘आयुर्वेद’, ‘ॲलोपॅथी’त वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:07+5:302020-12-12T04:36:07+5:30
ॲलोपॅथीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये अनेक वर्षे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर वेगवेगळ्या सर्जरी या ...

सरकारच्या निर्णयामुळे ‘आयुर्वेद’, ‘ॲलोपॅथी’त वाद
ॲलोपॅथीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये अनेक वर्षे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर वेगवेगळ्या सर्जरी या डाॅक्टरांकडून केल्या जातात, असा दावा ॲलोपॅथीच्या तज्ज्ञांचा आहे. तर आयुर्वेद पॅथी प्राचीन काळापासून असलेली भारतीय उपचार पद्धती असून, या उपचार पद्धतीतील सिद्धांतावरच माॅडर्न मेडिकल सायन्समध्ये सर्जरी केल्या जातात. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञांना दिलेली परवानगी योग्य आणि स्वागतार्ह असल्याचे या पॅथीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सर्जरी व प्लॅस्टिक सर्जरीचे जनक आयुर्वेदातील आहेत. हजारो वर्षांपासून या पॅथीद्वारे उपचार केले जातात. शस्त्रक्रियाही होतात. उलट ॲलोपॅथीचा इतिहास दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. आयुर्वेदातील सिद्धांतावरच माॅडर्न मेडिकलमध्ये सर्जरी सुरू आहेत. त्यामुळे कायदा करण्यास उशीर झाला. तरीपण स्वागत. - डाॅ. गणेश मलवाडे,
एम.एस. आयुर्वेद, लातूर
आयुर्वेद पॅथीला आमचा विरोध नाही. परंतु, आयुर्वेद संस्थांमध्ये शस्त्रक्रिया शिकविल्या जात नाहीत. शस्त्रक्रिया हा विषय गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे बीएएमएसच्या डाॅक्टरांना परवानगी देणे चुकीचे आहे. - डाॅ. विश्वास कुलकर्णी,
आयुर्वेदातील ईएनटी आणि एमएस डाॅक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आहे. आता त्याला कायद्यात रुपांतर केले आहे. त्यामुळे ॲलोपॅथीच्या तज्ज्ञांचे पोट दुखण्याचे कारण नाही. निर्णय योग्य.
- डाॅ. शिवाजी बिराजदार, निमा
आयुर्वेद उपचार पद्धती ५ हजार वर्षांपूर्वीची आहे. यात आता प्रगती झाली आहे. तर ॲलोपॅथीला केवळ दीडशे वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे विरोध करण्याचे कारण नाही. प्रशिक्षित डाॅक्टरांनाच परवानगी आहे.
- डाॅ. गणेश हाळे, आयुर्वेद तज्ज्ञ
एमबीबीएसनंतर सहा वर्षे प्रशिक्षण असते. त्यानंतर तीन वर्षे ज्युनिअर सर्जन म्हणून काम करावे लागते. तरच हळूहळू टेक्निक आत्मसात होते. सर्जरी साधासोपा विषय नाही. म्हणून परवानगी अयोग्य.
- डाॅ. विठ्ठल लहाने, प्लॅस्टिक सर्जन
बीएएमएस डाॅक्टरांना प्रशिक्षण नाही, अनुभवही नाही. प्रशिक्षण देऊन परवानगी देण्यास काही हरकत नाही. ज्ञान आणि कौशल्य सर्जरीत आवश्यक आहे. त्यामुळे प्रशिक्षण नसताना परवानगी देणे चुकीचे.
- डाॅ. हनुमंत किनीकर, न्यूरो सर्जन
रुग्णांसाठी नवीन कायदा फायदेशीर
सर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरीचे आचार्य सुश्रूत यांना जनक संबोधले जाते. त्यांच्या सिद्धांतावरच आधुनिक सर्जरी होतात. इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये ‘सुश्रूत’ हा ग्रंथ सर्जरीची संहिता म्हणून ठेवलेला आहे. त्यामुळे शल्य आणि शाल्य तज्ज्ञांकडून सर्जरी झाल्या तर फायदाच आहे. कमी दरामध्ये सेवा उपलब्ध होईल.
नवीन कायदा घातक
आयुर्वेद पॅथींना विरोध करण्याचे काही कारण नाही. परंतु, सर्जरी अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. एमएस झाल्यानंतर अनेक वर्षे कनिष्ठ सर्जन म्हणून काम केल्यानंतरच सर्जरी केल्या जातात. आयुर्वेदातील संस्थांमध्ये असे प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे परवानगी देणे नागरिकांसाठी घातक आहे.