कामासाठी लातूरला आले, घात झाला! देवणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकाचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:43 IST2025-10-11T15:42:00+5:302025-10-11T15:43:09+5:30
क्षुल्लक कारणावरून चाकुने सपासप वार. आरोपीला अटक.

कामासाठी लातूरला आले, घात झाला! देवणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकाचा निर्घृण खून
लातूर : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या बाचाबाचीतून एका शिक्षकावर सपासप चाकुने वार करुन खून करण्यात आल्याची घटना लातुरातील मारवाडी स्मशानभूमी परिसरात शुक्रवारी दुपारी ३ ते ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली. संशयीत आराेपीला पाेलिसांनी पकडले असून, याबाबत विवेकांनद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, रामेश्वर बाबुराव बिरादार (वय ३२ रा. सावरगाव, ता. देवणी) यांच्यासाेबत लातुरातील मारावाडी स्मशानभूमी परिसरात काही कारणावरुन बाचाबाची झाली. याच बाचाबाचीतून आराेपीने खिशातील चाकू काढला अन् सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेला शिक्षक रामेश्वर बिरादार हा जाग्यावरच काेसळला. स्थानिक नागरिक, गॅरेजवरील कामगारांनी घटनास्थळी धाव घेत जखमी शिक्षकाला ऑटाेमधून शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी समीर साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर, विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक संताेष पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. गुन्ह्यातील संशयीत आराेपीला पाेलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चाैकशी केली जात आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कामासाठी आला आणि घात झाला
मयत रामेश्वर बाबुराव बिरादार हा देवणी तालुक्यातील पंढरपूर-गुरधाळ येथील एका संस्थेवर कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत हाेता. दरम्यान, ताे शुक्रवारी गावाकडून लातुरात काही कामनिमित्त आला हाेता. दरम्यान, ताे नांदेड राेडवरील मारवाडी स्मशानभूमी येथे आला असता, आराेपी व त्याच्यात बाचाबाची झाली. यातून आराेपीने त्यांच्यावर चाकुने वार केले. रामेश्वर हा कामानिमित्त आला आणि लातुरात घात झाला.
माेबाईल-पैशांसाठी हल्ला केल्याचा संशय
ताब्यातील आराेपी मेघराज नगरात राहणारा असून, ताे २२ वर्षीय आहे. मयत शिक्षक रामेश्वर बिरादार यास आराेपीने माेबाईल, पैशांसाठी धमकावले असावे, यातून बाचाबाची झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, आराेपीने अचानक चाकूने हल्ला केला. शिक्षक बिरादार हे रक्ताच्या थाराेळ्यात पडले.