विद्युत डीपी जळाल्याने चांदोरीचे नागरिक १५ दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:41+5:302021-06-16T04:27:41+5:30
निलंगा : तालुक्यातील चांदोरी येथील विद्युत डीपी जळाल्यामुळे गाव १५ दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे ...

विद्युत डीपी जळाल्याने चांदोरीचे नागरिक १५ दिवसांपासून अंधारात
निलंगा : तालुक्यातील चांदोरी येथील विद्युत डीपी जळाल्यामुळे गाव १५ दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. दुरुस्तीची सातत्याने मागणी करुनही त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
निलंगा तालुक्यातील चांदोरी हे साडेतीन हजार लोकसंख्येचे आणि ८०० उंबरठ्यांचे गाव आहे. गावच्या वीजपुरवठ्यासाठी तीन विद्युत डीपी आहेत. मात्र, १५ दिवसांपूर्वी यातील दोन डीपी जळाल्या आहेत. परिणामी, संपूर्ण गाव अंधारात आहे. गावचा वीजपुरवठा बंद झाल्याने गावातील पिठाच्या गिरण्याही बंद आहेत. त्यामुळे दळण कोठून आणायचे, असा प्रश्न महिलांपुढे निर्माण झाला आहे. याशिवाय कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. परंतु, वीज नसल्याने मोबाईल चार्जिंगचीही सोय नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
वीजपुरवठा खंडित असल्याने गावातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील आबालवृद्धांना शेतातून घागरीने पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची पायपीट होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामुळे विंचू, किड्यांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ही समस्या महावितरणच्या अधिका-यांकडे मांडण्यात आली आहे, परंतु अद्यापही डीपी बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
लवकरच डीपी बसविला जाईल...
चांदोरी गावातील विद्युत डीपी जळाल्याने त्याचा अहवाल तयार करून मुख्य कार्यालयाला पाठविला आहे. लवकरच विद्युत डीपी उपलब्ध होईल. त्यानंतर तत्काळ बसविण्यात येईल आणि वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
- एस.एस. देवडे, सहायक अभियंता.
गावात विविध समस्या...
गावातील डीपी जळाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. परंतु, अद्यापही महावितरणने विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही. परिणामी, गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याशिवाय, पिठाच्या गिरण्याही बंद आहेत, असे गावातील नागरिकांनी सांगितले.