चालकाचा ताबा सुटल्याने कार हॉटेलमध्ये घुसली

By हरी मोकाशे | Updated: February 16, 2025 19:15 IST2025-02-16T19:15:03+5:302025-02-16T19:15:20+5:30

एकजण ठार : मुरुडजवळील घटना

Car crashes into hotel after driver loses control | चालकाचा ताबा सुटल्याने कार हॉटेलमध्ये घुसली

चालकाचा ताबा सुटल्याने कार हॉटेलमध्ये घुसली

मुरुड (जि. लातूर) : विवाहासाठी पुण्याहून लातूरला निघालेल्या नातेवाईकांच्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने जीप थेट हॉटेलमध्ये घुसली. तेव्हा चहा पीत बसलेल्या पाच जणांना जोराची धडक बसली. त्यात एकजण मयत झाल्याची घटना रविवारी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास टेंभूर्णी- लातूर मार्गावरील मुरुड बायपासजवळ घडली.

तेजस पवन मुंदडा (२३, रा. मुरुड, ता. लातूर) असे मयताचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील चिखली येथील जगताप कुटुंबिय नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी रविवारी लातूरला जीप (एमएच १२, पीसी ३७४०) मधून निघाले होते. त्यात चालक कल्पेश जगताप, अशोक जगताप व रंजना जगताप हे होते. दरम्यान, ही जीप टेंभूर्णी- लातूर मार्गावरील मुरुड बायपासजवळ पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि थेट हॉटेलमध्ये घुसली. तेव्हा तेजस मुंदडा, सूरज युवराज घुटे, आदित्य माळी, विवेक चांडक, दशरथ हिंगले (सर्वजण रा. मुरुड) हे चहा पीत बसले होते. जीपच्या अपघातात हे सर्वजण जखमी झाले. त्यातील तेजस पवन मुंदडा यांचा मृत्यू झाला. तसेच जीपमधील दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर लातुरात उपचार सुरु आहेत. अधिक तपास मुरुड पोलिस करीत आहेत.

Web Title: Car crashes into hotel after driver loses control