कर्करुग्णांची परवड थांबली; लातूरच्या सुपरस्पेशालिटीत माेफत किमोथेरपी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:21 IST2025-07-07T18:20:40+5:302025-07-07T18:21:35+5:30
रुग्ण-नातेवाइकांना दिलासा : नियमित वैद्यकीय सुविधेस प्रारंभ

कर्करुग्णांची परवड थांबली; लातूरच्या सुपरस्पेशालिटीत माेफत किमोथेरपी!
लातूर : शहरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुमारे पाच महिन्यांपासून कर्करोग निदान व शस्त्रक्रियेची सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, किमोथेरपीची सेवा नव्हती. परिणामी, रुग्णांना किमोथेरपीसाठी अन्य रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत होती. आठवड्याभरापासून ही सुविधा सुरू करण्यात आल्याने कर्करुग्णांची परवड थांबली आहे.
दुर्धर कर्करोगाच्या लक्षणांचे वेळीच निदान न झाल्यास वेदनेबरोबर खर्चही वाढतो. त्यामुळे शहरातील अतिविशेषोपचार रुग्णालयात पाच महिन्यांपासून कर्करोग निदान विभाग सुरू करण्यात आला. प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुरू केले. त्यात नियमित तपासणी, निदान व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
दोन रुग्णांवर किमोथेरपी
सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दोन रुग्णांवर शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी करण्यात आली. कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमोल कोटलवार यांच्या निरीक्षणाखाली ही वैद्यकीय सेवा देण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुनील होळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव, डॉ. उद्धव माने, डॉ. मेघराज चावडा, सर्जन डॉ. गणेश स्वामी, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. गौरव बिराजदार, अधिसेविका अमृता पोहरे उपस्थित होते.
१० हजारांपर्यंत खर्च
कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी लागते. ती आता सुपरस्पेशालिटीमध्ये सुरू करण्यात आली आहे. एका किमोथेरपीस किमान १० हजारांपर्यंत खर्च येतो. येथे ही सेवा मोफत आहे, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमोल कोटलवार यांनी सांगितले.
कर्करोगाच्या वेदना अधिक होऊ लागल्यानंतर रुग्णांची धावपळ होते. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.
डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता
कर्करोगाचे निदान, उपचारावर खासगी अधिक खर्च होतो. त्यामुळे सुपरस्पेशालिटीमध्ये औषधी, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची परवड थांबणार आहे.
- डॉ. सुनील होळीकर, विशेष कार्य अधिकारी