पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले

By राजकुमार जोंधळे | Updated: May 6, 2025 22:24 IST2025-05-06T22:06:16+5:302025-05-06T22:24:26+5:30

Latur Crime News: पाकिस्तानचा आहेस का? काश्मीरहून आला का? असे हिणवत एका ३० वर्षीय युवकाला मारहाण करण्यात आली. त्यावेळी तुझे छायाचित्र काढले असून, चित्रीकरणही केले आहे आणि ते फेसबुक, व्हाॅटस्ॲपवर व्हायरल करताे, अशी धमकी दिल्याने त्या युवकाने लातुरात राहत्या घरी आत्महत्या केली.

Called a Pakistani, beaten up, a young man in Latur ends his life | पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले

पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले

- राजकुमार जाेंधळे
लातूर - पाकिस्तानचा आहेस का? काश्मीरहून आला का? असे हिणवत एका ३० वर्षीय युवकाला मारहाण करण्यात आली. त्यावेळी तुझे छायाचित्र काढले असून, चित्रीकरणही केले आहे आणि ते फेसबुक, व्हाॅटस्ॲपवर व्हायरल करताे, अशी धमकी दिल्याने त्या युवकाने लातुरात राहत्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी साेमवारी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मयत युवकाची पत्नी समरीन अमीर पठाण यांनी पाेलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवार, ३ मे राेजी रात्री त्यांचे पती अमीर गफूर पठाण (वय ३०) हे नेहमीप्रमाणे धाराशिव येथील नाेकरीच्या ठिकाणावरून परतणाऱ्या पत्नीला आणण्यासाठी लातुरातील संविधान चाैकात आले हाेते. पती-पत्नीचा फाेन सुरू हाेता. त्यावेळी पत्नी समरीन यांना समाेरून आवाज येत हाेते. मला मारू नका, माझी काही चूक नाही. समाेरची व्यक्ती पती अमीर यांना धमकावत हाेती. मी पत्रकार आहे, तुझे नाव काय? तू काश्मीरहून आला आहेस का? पाकिस्तानचा आहेस का? असे म्हणून मारहाण सुरू हाेती. पती अमीर यांचा किंचाळण्याचा आवाज येत हाेता. त्याचवेळी समाेरच्या व्यक्तीने मी तुझा फाेटाे घेतला आहे, व्हिडीओ केला आहे. ते फेसबुक, व्हाॅटसॲपवर व्हायरल करताे.

त्यावेळी अमीर हे विनवणी करीत हाेते. ज्यावेळी पत्नी बसथांब्यावर उतरली तेव्हा त्यांना घेण्यासाठी आलेले अमीर पठाण हे फुलाच्या दुकानासमाेर घाबरलेले हाेते. शर्टची बटने तुटलेली हाेती. त्यावेळी अमीर यांनी समाेर उभे असलेल्या (एम.एच. २४ बी.आर. ७००८) काळ्या रंगाच्या किया कारकडे इशारा केला. त्या वाहनातील अनाेळखी व्यक्तीने अवघड जागेवर मारहाण केली. फाेटाे, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पत्नीला सांगितले. याप्रकरणी कारमधील अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी पाेलिसात साेमवारी गुन्हा दाखल केला आहे.

मी भारतीय, माझा अवमान...
मारहाणीनंतर अमीर पठाण घरी आल्यावर तणावामध्ये हाेते. मी भारतीय आहे, मला विनाकारण पाकिस्तानचा म्हणून अपमानित केले. माझे फाेटाे काढले, व्हिडीओ केले. मला जगावे वाटत नाही, असे अमीर यांनी पत्नीला सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, ४ मे राेजी सकाळी उठून अमीर हे सतत माेबाईलवर फाेटाे, व्हिडीओ व्हायरल झालेत का? ते बघत हाेते. रात्री पठाण कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता, ९ वाजण्याच्या सुमारास छताच्या लाेखंडी कडीला गळफास घेतल्याचे पत्नीने जबाबात म्हटले आहे.

Web Title: Called a Pakistani, beaten up, a young man in Latur ends his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.