पोलिस असल्याची बतावणी करून ५१ हजारांचे दागिने पळविले
By हरी मोकाशे | Updated: April 20, 2023 19:13 IST2023-04-20T19:12:53+5:302023-04-20T19:13:13+5:30
पुढे चोरी झालेली आहे, असे सांगून केली फसवणूक

पोलिस असल्याची बतावणी करून ५१ हजारांचे दागिने पळविले
उदगीर : येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बनशेळकी रोडवर पोलिस असल्याचे सांगून दोघा अज्ञातांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट व अंगठी पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांत बुधवारी रात्री अज्ञात दोघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील बनशेळकी येथील फिर्यादी सय्यद महमद महताबसाब हे १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उदगीरकडे येत होते. तेव्हा अज्ञात दोघांनी दुचाकीवर येऊन पुढे चोरी झालेली आहे. आम्ही पोलिस आहोत. त्याचा तपास करीत आहोत. त्यामुळे तुमच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट व सोन्याची अंगठी खिशात ठेवा, असे सांगून फिर्यादीच्या गळ्यातील लॉकेट व हातातील अंगठी काढून रुमालात ठेवली. रुमाल खिशात ठेवा म्हणून दुचाकीवरुन निघून गेले. त्यानंतर फिर्यादीने रुमाल काढून पाहिले असता सोन्याची अंगठी व लॉकेट त्यात नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांत बुधवारी अज्ञात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.