उदगीर येथे दुचाकीला उडवले; शिक्षक जागीच ठार, पत्नी गंभीर; महामार्गावर झाला अपघात
By राजकुमार जोंधळे | Updated: July 8, 2024 00:33 IST2024-07-08T00:31:57+5:302024-07-08T00:33:48+5:30
रविवारी दुपारी चार वाजता घडली दुर्घटना

उदगीर येथे दुचाकीला उडवले; शिक्षक जागीच ठार, पत्नी गंभीर; महामार्गावर झाला अपघात
राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर): भरधाव कारने दुचाकीला उडवल्याची घटना उदगीर शहरातील नळेगाव राेडवर रविवारी दुपारी चार वाजता घडली. यामध्ये शिक्षक ठार झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
उदगीर शहरातील विद्यावर्धिनी इंग्रजी शाळेत शिक्षक असलेले रवि गुळंगे (वय ४०) हे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून एका कार्यक्रमासाठी पत्नीसह जात हाेते. दरम्यान, मलकापूरनजीक नळेगाव रोडवर असलेल्या दालमिलसमोर आले असता, भरधाव स्विफ्ट डिझायर कारने (एम.एच.२४ ए.फ. ४०११) त्यांच्या दुचाकीला (एम.एच.२४ एल. २३६३) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शिक्षक रवी गुळंगे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर कारसह चालक पसार हाेत हाेता. त्याचा पाठलाग करून कार आष्टामोड येथे ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मयत रवी गुळंगे यांचा मृतदेह उदगीर सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी पत्नीला उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती. शिक्षक रवी गुळंगे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता उदगीर येथील फुलेनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.