तांबरवाडी शिवारात दुचाकीचा अपघात; सीआरपीएफ जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 12:46 IST2024-10-09T11:38:38+5:302024-10-09T12:46:45+5:30
याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तांबरवाडी शिवारात दुचाकीचा अपघात; सीआरपीएफ जवानाचा मृत्यू
किल्लारी/उस्तुरी (जि. लातूर) : लामजना ते निलंगा जाणाऱ्या रस्त्यावर तांबरवाडी शिवारात दुचाकीवरून गावाकडे जाणाऱ्या सीआरपीएफ जवानाच्या दुचाकीचा मंगळवारी रात्री ९.३० वाजता अपघात झाला. यात जवानाचा जागीच मृत्यू झाला असून, मल्लिकार्जुन शाहूराज रेड्डी (वय ३३ रा. वाकसा ता. निलंगा) असे नाव आहे.
किल्लारी पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील वाकसा येथील मल्लिकार्जुन रेड्डी हे केंद्रीय राखीव पोलीस दलात दिल्ली येथे सेवेत होते. गावाकडे आजी आजारी असल्याने दोन दिवसांपूर्वी रजा घेऊन ते आले होते. मंगळवारी रात्री ९.३० वाजता लामजना ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील तांबरवाडी शिवारात खड्डयामुळे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर लामजना येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.