बडे दिलवाला ! मुलाच्या विवाहाबरोबर केले २२ जणांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 07:26 PM2021-10-18T19:26:52+5:302021-10-18T19:28:57+5:30

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले.

Big hearted! arrangement of 22 couples on his child's marriage | बडे दिलवाला ! मुलाच्या विवाहाबरोबर केले २२ जणांचे शुभमंगल

बडे दिलवाला ! मुलाच्या विवाहाबरोबर केले २२ जणांचे शुभमंगल

Next
ठळक मुद्देसंसारोपयाेगी साहित्याची दिली भेट

- आशपाक पठाण
लातूर : इस्लाम धर्मात निकाह (विवाह) हा अत्यंत साध्या पद्धतीने करावा, अशी शिकवण मोहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब करीत, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून लातूरच्या सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर समाजातील २२ जोडप्यांचा विवाह लावून दिला. त्याचबरोबर, त्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले, हाताला काम नसल्याने काहींना मुला, मुलींच्या लग्नाची चिंता भेडसावत असताना, सरफराज मणियार यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजू लोकांचा शोध घेतला. त्यात २२ जोडप्यांनी नोंदणी केली. कसलाही गाजावाजा न करता, अतिशय साध्या पद्धतीने रविवारी हा विवाह सोहळा संपन्न झाला. हैद्राबाद येथील धर्मगुरू मौलाना सय्यद मोहम्मद महेमुद हुसैनी कादरी यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले, तसेच इस्लामची शिकवण आणि काळाची गरज पाहता, अशा प्रकारचे विवाहसोहळे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गरजूंना दिला मदतीचा हात...
कोरोनाच्या काळात हातावरचे पोट असणारे अनेक कुटुंब संकटात सापडले. त्यांनाही मदतीचा हात दिला. कोरोना ओसरत असताना मुलाच्या विवाहाबरोबर सामुदायिक विवाह सोहळा घेण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. २२ जणांची नोंदणी झाली, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून, रविवारी सकाळी ११ वाजता लातूर शहरातील ६० फूट रोडवर असलेल्या मंगल कार्यालयात विवाह सोहळा संपन्न झाला. वऱ्हाडी मंडळींची गैरसोय होऊ नये, यासाठी शेकडो स्वयंसेवक होते. उत्कृष्ट पद्धतीचे व्हेज, नॉनव्हेजचे जेवण देण्यात आले.

इस्लामची शिकवण...
गरीब असो की श्रीमंत, सर्वांनी आपल्या मुलांचा विवाह साध्या पद्धतीने करावा, जेणेकरून कुणाच्याही पालकांना विवाह ही बाब त्रासदायक वाटणार नाही, अशी इस्लामची शिकवण आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सरफराज मणियार यांनी स्वखर्चातून २२ जोडप्यांचा निकाह लावून दिला. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेता आले, याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Web Title: Big hearted! arrangement of 22 couples on his child's marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app