कचरा जाळाल तर खबरदार; लातूर मनपाकडून दोघाजणांवर गुन्हे, दंड वसूल
By हणमंत गायकवाड | Updated: March 14, 2023 17:19 IST2023-03-14T17:19:10+5:302023-03-14T17:19:46+5:30
गांधी चौक पोलिस ठाण्याच्या समोर तसेच रिंग रोड परिसरात कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

कचरा जाळाल तर खबरदार; लातूर मनपाकडून दोघाजणांवर गुन्हे, दंड वसूल
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत कुठे ना कुठे कचरा जाळला जात असल्याची घटना घडत असल्याने मनपाने यावर लक्ष केंद्रित केले असून, दंडात्मक कारवाईला प्रारंभ केला आहे. मंगळवारी दोघांना कचरा जाळल्याप्रकरणी समज देण्यात आली असून, एकाला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गांधी चौक पोलिस ठाण्याच्या समोर तसेच रिंग रोड परिसरात कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. यातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी परिसरात कचरा जाळल्यामुळे अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिवसेंदिवस कचरा जाळण्याच्या घटना घडत असल्याने मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी क्षेत्रीय अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेतली. लातूर शहरात कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे नोंदवावेत, दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. प्रत्येक प्रभागात स्वच्छता निरीक्षकांना प्राधिकृत केले असून, शहरात ज्या भागात कचरा जाळण्याचे निदर्शनास येईल, त्या ठिकाणी कारवाई करावी, असेही यावेळी निर्देश देण्यात आले. कचरा जाळल्याच्या घटना निदर्शनास आल्यास ८५३०९५८०५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.