लातूर जिल्ह्यातील प्रकल्पांत जेमतेम जलसाठा; फक्त २८ टक्केच उपयुक्त पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 04:02 PM2023-10-13T16:02:48+5:302023-10-13T16:03:59+5:30

दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली, पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे

Barely water storage in projects in Latur district; Only 28 percent useful water! | लातूर जिल्ह्यातील प्रकल्पांत जेमतेम जलसाठा; फक्त २८ टक्केच उपयुक्त पाणी!

लातूर जिल्ह्यातील प्रकल्पांत जेमतेम जलसाठा; फक्त २८ टक्केच उपयुक्त पाणी!

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्यामुळे यंदा लवकरच टंचाईचे ढग येण्याची भीती आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत केवळ २८.३७ टक्के जलसाठा आहे. परिणामी, पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे ठरत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात विलंबाने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही उशिरा झाल्या. साधारणत: जूनअखेरीसपासून पेरणीस सुरुवात झाली. तद्नंतर रिमझिम पाऊस झाल्याने पिकांची चांगली उगवण झाली. मात्र, जलसाठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात घट झाली. दरम्यान, दरवर्षी परतीचा अधिक पाऊस होतो, असा गेल्या तीन-चार वर्षांपासूनच अनुभव आहे. त्यामुळे परतीचा पाऊस येईल, अशी आशा होती. मात्र, ऑक्टोबरमधील दोन आठवडे उलटत आले तरी पाऊस नाही. त्यामुळे आता पावसाची आशा धूसर झाली आहे.

३४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा
जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी रेणापूर तालुक्यातील व्हटी व उदगीर तालुक्यांतील तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. त्याचबरोबर उर्वरित सहा मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३४.६५० दलघमी पाणीसाठा आहे. त्यात सर्वाधिक पाणीसाठा घरणी प्रकल्पात असून, तो ८.४६७ दलघमी आहे. सर्वात कमी उपयुक्त जलसाठा तावरजा मध्यम प्रकल्पात असून, तो १.०९९ दलघमी आहे.

१५ दिवसांपूर्वीच्या पावसाने पाणीसाठा
यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने जेमतेम पाऊस झाला आहे. त्यामुळे जलसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. त्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली होते. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे एका मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

प्रशासनाकडून वारंवार सूचना
यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने प्रकल्पातील अवैध पाणी उपसा रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या १३४ लघु प्रकल्पांमध्ये ८६.८०९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, त्याची २७.६२ अशी टक्केवारी आहे. दरम्यान, यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

व्हटी, तिरुमध्ये उपयुक्त पाणी शून्य टक्के
मध्यम प्रकल्प - उपयुक्त साठा दलघमीमध्ये - टक्केवारी

तावरजा - १.०९९ - ५.४०
व्हटी - जोत्या - ००
रेणापूर - ५.०३१ - ३४.४८
तिरू - जोत्या - ००
देवर्जन - ४.६२९ - ४३.३४
साकोळ - ७.१८० - ६५.५८
घरणी - ८.४६७ - ३७.८९
मसलगा - ८.२४५ - ६०.६३
एकूण - ३४.६५० - २८.३७

सरासरी ५४० मिमी पाऊस...
तालुका - सरासरी पाऊस

लातूर - ५३९.४
औसा - ४६४.९
अहमदपूर - ५२२.६
निलंगा - ५२७.८
उदगीर - ६८९.२
चाकूर - ४८०.६
रेणापूर - ४६६.१
देवणी - ६९९.४
शिरुर अनं. - ५२४.४
जळकोट - ५२६.९
एकूण - ५४०.००
 

Web Title: Barely water storage in projects in Latur district; Only 28 percent useful water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.