लातूर शहरातील एका बँकेत पैसे भरायला गेलेल्या ग्राहकाच्या पैशाची पिशवी पळविणाऱ्या चाेरट्याला गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले असून, त्याच्याकडून चोरलेली रक्कम जप्त केली आहे. याबाबत गांधी चाैक ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील मजगे नगरात एका बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचे स्लिप भरताना बाजूला ठेवलेली ९० हजारांची राेकड अज्ञातांनी नजर चुकवत पळविल्याची घटना २५ ऑगस्ट राेजी घडली. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधिक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समिरसिंह साळवे यांनी आराेपींना पकडण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार गांधी चाैक ठाण्याचे पाेनि. सुनिल रेजीतवाड यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत चोरट्याचा शोध घेतला.
काही तासाच्या आतच एका संशयीताला ताब्यात घेत कसून चाैकशी केली असता, त्याने मनोज भाऊसाहेब वाघमारे (रा. म्हाडा कॉलनी, लातूर) असे नाव सांगितले. पैसे चाेरल्याची कबुली दिली असून, पाेलिसांनी ९० हजार जप्त केले आहेत. तपास अनिल कज्जेवाड हे करीत आहेत. ही कारवाई गांधी चौक ठाण्याचे पोउपनि. गणेश गित्ते, सफौ. राजेंद्र टेकाळे, अंमलदार राम गवारे, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, शिवराज भाडुळे, प्रकाश भोसले, राहुल दरोडे, एम.बी. फुटाने यांच्या पथकाने केली.