धसवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कोपनरवाडी, नाईक नगर, खडकाडी तांडा, उद्धव तांडा व भोजा तांडा अशा ५ वाडी-तांड्यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतीमध्ये असून धसवाडी ते उद्धव तांडा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग विभागाकडे रस्ता क्रमांक ११ म्हणून या रस्त्याची नोंद झाली आहे. उद्धव तांडा या तांड्याची लोकसंख्या दीडशे ते दोनशे असून या तांड्यामध्ये चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या ठिकाणी अंगणवाडी नसल्यानेे उद्धवतांडा येथील वय वर्षे शून्य ते सहा वयापर्यंतची लहान मुले अंगणवाडीमध्ये शिकण्यासाठी धसवाडी येथे येतात. या लहान बालकांना दीड किलोमीटर अंतर पायी चालत यावे लागते. रस्त्यामध्ये खाच-खळगे मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचलेले असते. त्यामुळे पाण्यातील उंचवट्यावर पाय ठेवून या बालकांना कसरत करीत अंगणवाडीत जाऊन शिक्षण घ्यावे लागते. शालेय मुलांना, महाविद्यालयीन मुलांना ही शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. आजारी व्यक्तींना पाठीवर किंवा वेगळ्या पद्धतीची सोय करून त्यांना धसवाडीपर्यंत आणावे लागते व तेथून वाहनाने दवाखान्यात न्यावे लागते. त्यामुळे उद्धवतांडा येथील लोकांना या रस्त्याने चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एसटीचा प्रवासी वाहतूकही बंदच...
२००१ मध्ये या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्यावरून महामंडळाची बससेवा सुरू होती. परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून रस्ता खराब झाल्यामुळे एसटीची सेवाही पुरती बंद झाली असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी धसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सरपंच अविनाश देशमुख, सरपंच प्रेमचंद दुर्गे, एन.डी. दुर्गे यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.