लातुरातील आडत बाजारात दिवाळीमुळे सोयाबीनची आवक वाढली, मात्र दर स्थिरच
By राजकुमार जोंधळे | Updated: October 17, 2022 19:55 IST2022-10-17T19:54:51+5:302022-10-17T19:55:05+5:30
दर स्थिरच : पोटलीचा दर ४९५० रुपये प्रति क्विंटल

लातुरातील आडत बाजारात दिवाळीमुळे सोयाबीनची आवक वाढली, मात्र दर स्थिरच
लातूर : दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे बाजारात जुन्या सोयाबीनची आवक वाढलेली आहे. तीन ते साडेतीन हजार क्विंटल दररोज होणारी आवक आता साडेसात हजारांवर गेली आहे. दर मात्र स्थिरच आहेत. सौद्यापेक्षा पोटलीचा दर कमी आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये सोमवारी गहू, रबी ज्वारी, हरभरा, तूर, मूग, उडीद, करडई आणि सोयाबीन आदी शेतमालाची आवक होती. त्यात सर्वाधिक ७५२१ क्विंटल सोयाबीनची आवक होती. सोयाबीनचा सर्वसाधारण दर ५०७० रुपये, कमाल दर ५२०९, तर किमान ४७०० रुपये प्रति क्विंटल होता. सौद्याचा दर ५०७० रुपये होता, तर पोटलीमध्ये ४९५० रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला असल्याचे सोयाबीन विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.
अशी होती आवक...
शेतमाल आवक सर्वसाधारण दर
गहू १०६ २७००
रबी ज्वारी २०५ ३०००
हरभरा २०० ४४५०
तूर १९२ ७५००
मूग ३८० ६८००
उडीद १०६८ ७२३०
करडई ५४ ४८००
सोयाबीन ७५२१ ५०७०