लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, शुक्रवारी आणखी ५३१ बाधितांची भर पडली असून, ५३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता बाधितांचा आलेख ८६ हजार ९८५ वर पोहोचला असून, यातील ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत ४ हजार ५९६ रुग्ण गृहविलगीकरण व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी १३०७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १७७ रुग्ण बाधित आढळले. तर २७३५ व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ३५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून ५३१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या रुग्णालयात ४ हजार ५९६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २७३७ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर १ हजार ८५९ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर व दवाखान्यात दाखल आहेत. उपचार घेत असलेल्या ४ हजार ५९६ रुग्णांपैकी ५७२ रुग्ण आयसीयूमध्ये, ३० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर तर २५६ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. ८३१ रुग्ण मध्यम परंतु, ऑक्सिजनवर असून, ३१० रुग्ण मध्यम परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. तर ३ हजार १६९ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.
५३४ रुग्णांना मिळाली सुटी...एकूण ८६ हजार ९८५ रुग्णांपैकी ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी ५३४ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ३७६, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १९, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ७, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २२, औसा ग्रामीण रुग्णालयातील २, कासारशिरसी येथील १, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ४३, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील ८, निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील २, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील ७, सामाजिक न्याय भवन लामजना येथील ३, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील २६ अशा एकूण ५३४ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के...आतापर्यंत ८० हजार ४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के असून, रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे.