वर्गात शिक्षकाचे टोमणे जिव्हारी लागले, विद्यार्थिनीने घरी येऊन स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 19:23 IST2023-01-21T19:22:42+5:302023-01-21T19:23:10+5:30
खाजगी शिकवणी साेडली व काॅपी प्रकरणावरुन टाेमणे मारल्याचा आराेप

वर्गात शिक्षकाचे टोमणे जिव्हारी लागले, विद्यार्थिनीने घरी येऊन स्वतःला संपवले
लातूर : इयत्ता नववी वर्गातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी शिवाजीनगर पाेलिसांनी एका शिक्षकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित शिक्षकाने खाजगी शिकवणी साेडल्याच्या कारणाने व काॅपी प्रकरणावरुन टाेमणे मारल्याचा आराेप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पाेलिसात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, त्यांची मुलगी औसा राेडवरील किडीज् इन्फाेपार्क शाळेत नववी वर्गात शिकत हाेती. घटक चाचणी परीक्षेतील जुन्या काॅपी प्रकरणावरुन तिला आराेपी शिक्षक राहुल जे. पवार यांनी टाेमणा मारला हाेता. तसेच खाजगी शिकवणी साेडल्याचा राग मनात धरून अवमानकारक बाेलले हाेते, अशी तक्रार मुलीने आईकडे केली हाेती.
दरम्यान, विद्यार्थिनीने राहत्या घरी १८ जानेवारी राेजी सायंकाळी गळफास घेतला. त्यावेळी घटनास्थळी पाेलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन शिक्षक राहुल जे. पवार याचेविरुद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक दयानंद पाटील करत आहेत.