मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:37+5:302021-06-25T04:15:37+5:30
चाकूर : चाकूर शहरासह तालुक्यातील शासकीय,निमशासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे. यापुढे जे कोणी मुख्यालयी राहणार नाहीत. त्यांच्यावर कठोर ...

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार
चाकूर : चाकूर शहरासह तालुक्यातील शासकीय,निमशासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे. यापुढे जे कोणी मुख्यालयी राहणार नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी दिला. याप्रकरणी चाकूर संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक तहसील कार्यालयात गुरुवारी घेण्यात आली.
चाकूर तालुक्यातील शासकीय,निमशासकीय अधिकारी,कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. पाच दिवसांचा आठवडा झाला आहे. बहुतांश कार्यालयात कोणी सकाळी ९.४५ वाजता येत नाहीत. तर सायंकाळी ६.१५ पर्यंत थांबत नाहीत. त्यामुळे तालुक्याच्या विकास कामावर परिणाम झाला आहे. कार्यालयातील जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच प्रत्येक कार्यालयात बायोमेट्रिक मशीन,सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. या मागणीसाठी चाकूर संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव लोहारे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची गांभीर्याने दखल तहसीलदार डॉ.बिडवे यांनी घेतली. गुरुवारी गटविकास अधिकारी पंचायत समिती, मुख्याधिकारी नगर पंचायत, भूमी अभिलेख कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुख उपस्थित हाेते. तहसीलदार डॉ.बिडवे यांनी अधिकारी,कर्मचारी यांनी त्यांचे निवासाची पत्ते लेखी स्वरूपात तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. वेळीच सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयी राहवे.त्यावर कोणी राहिले नाही.तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार नाही, अशी तंबी तहसीलदार यांनी दिली. तसेच सर्व कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन तत्काळ बसविण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.
चाकूर तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. जे कोणी मुख्यालयी राहत नाहीत.आणि यापुढे राहणार नाहीत, अशा कर्मचाऱ्यांचे पुरावे गोळा करत आहोत. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणारे विरुध्द पोलिसात गुन्हे दाखल करणार आहोत.
सुधाकरराव लोहारे,सामाजिक कार्यकर्ते
तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी सर्वच अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात ज्या कडक शब्दात सूचना दिले ते योग्य झाले. तहसीलदार यांचे समितीच्या वतीने आभार मानतो. जोपर्यंत अधिकारी, कर्मचारी याची १०० टक्के मुख्यालयी राहणार नाहीत. तोपर्यंत आमचा हा लढा यापुढे सुरूच राहील.
मिलिंद महालिंगे माजी नगराध्यक्ष नगरपंचायत चाकूर