पाेलिसांच्या काेठडीतून पळालेल्या आराेपीस लातुरात अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: January 16, 2023 19:35 IST2023-01-16T19:35:30+5:302023-01-16T19:35:55+5:30
उदगीर येथील पाेलीस काेठडीतून पळालेला आराेपी लातुरातील नवीन नांदेड नाका परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली.

पाेलिसांच्या काेठडीतून पळालेल्या आराेपीस लातुरात अटक
लातूर : पाेलिसांच्या काेडीतून पळालेल्या आराेपीला लातुरातील नवीन नांदेड नाका परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उचलले आहे. त्याच्याविराेधात उदगीर येथील ग्रामीण पाेलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहेत. त्याला उदगीर ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या लखन ईश्वर कसबे (रा. करडखेल, ता. उदगीर) याला अटक करण्यात आली हाेती. दरम्यान, प्राणघातक हल्ला, दंगा अशा गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या लखन कसबे याने पाेलिसांच्या काेठडीतून २ सप्टेंबर राेजी पलायन केले हाेते. तेव्हापासून पाेलिस त्याच्या अटकेसाठी मागावर हाेते. मात्र, ताे पाेलिसांनी सतत गुंगारा देत फिरत हाेता. कायदेशीर काेठडीतून पळून गेल्याने त्याच्यावर उदगीर पाेलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला हाेता. याबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेत, फरार आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाने फरार आराेपींचा शाेध सुरू केला हाेता.
दरम्यान, उदगीर येथील पाेलीस काेठडीतून पळालेला आराेपी लातुरातील नवीन नांदेड नाका परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माेठ्या शिताफीने त्याला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश जाधव, अंमलदार बालाजी जाधव, खुर्रम काजी, सचिन मुंडे, दिनेश देवकते, प्रमोद तरडे, विनोद चिलमे, यशपाल कांबळे, रवी गोंदकर यांच्या पथकाने केली आहे.