महाविद्यालयात प्रवेश घेऊन परणाऱ्या बहीण-भावास भरधाव टिप्परने चिरडले

By हरी मोकाशे | Updated: July 3, 2023 19:58 IST2023-07-03T19:56:09+5:302023-07-03T19:58:29+5:30

दुचाकीवरील बहीण- भावास भरधाव वेगातील टिप्पर जोराची धडक दिली.

Accidental death of brother and sister while returning from college | महाविद्यालयात प्रवेश घेऊन परणाऱ्या बहीण-भावास भरधाव टिप्परने चिरडले

महाविद्यालयात प्रवेश घेऊन परणाऱ्या बहीण-भावास भरधाव टिप्परने चिरडले

चाकूर/ आष्टामोड (जि. लातूर) : भावाचा लातुरातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या बहीण- भावास भरधाव वेगातील टिप्पर जोराची धडक दिली. यात हे बहीण- भाऊ गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास लातूर- चाकूर मार्गावरील आष्टामोड चौकात घडली.

निकिता शिवराज रकताटे (२०), अवधूत शिवराज रकताटे (१८, रा. अंबुलगा, ता. चाकूर) असे मयत बहीण- भावाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील अंबुलगा येथील निकिता रकताटे ही लातुरातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दरम्यान, सोमवारी तिचा भाऊ अवधूत रकताटे याचा लातुरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेण्यात आला. ही प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर दुपारी हे बहीण-भाऊ दुचाकी (एमएच २४, बीडी ३२२७) वरुन गावाकडे परतत होते. ते आष्टामोड येथील चौकात आले असता खडी भरुन लातूरकडे भरधाव वेगात निघालेल्या टिप्पर (एमच २०, ईआय ७२०४) ने त्यांना समोरुन जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बहीण- भावाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच चाकूरचे पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोहेकॉ. भगवत मामडगे, विष्णू गुंडरे, पांडुरंग दाडगे, आकाश कातपूरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तात्काळ टिप्पर पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Accidental death of brother and sister while returning from college