जीमहून परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; लातूर शहरात कार-मोटारसायकलची टक्कर

By राजकुमार जोंधळे | Updated: June 8, 2025 20:36 IST2025-06-08T20:35:53+5:302025-06-08T20:36:00+5:30

अंबाजोगाई रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येताना मयुरबन काॅलनीकडे वळणारी कार आणि बुलेटची जोरदार धडक झाली.

A young man returning from the gym was hit by a car; Car-motorcycle collision in Latur city | जीमहून परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; लातूर शहरात कार-मोटारसायकलची टक्कर

जीमहून परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; लातूर शहरात कार-मोटारसायकलची टक्कर

राजकुमार जाेंधळे

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील कॉक्सिट महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे मोटारसायकल आणि कारची टक्कर झाली. या भीषण अपघातात २३ वर्षीय नहुष राहुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर नरेंद्र अर्जुन जाधव (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत. नहुष आणि नरेंद्र हे दोघेजण जीमवरून परतत होते. अंबाजोगाई रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येताना मयुरबन काॅलनीकडे वळणारी कार आणि बुलेटची जोरदार धडक झाली. यात नहुष पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर नरेंद्र जाधव गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लातूरच्या गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमीच्या मेंदूला गंभीर इजा...
जखमी नरेंद्र जाधव यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून, पाठीच्या मणक्याला आणि पोटाला जबर मार बसला आहे. प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. विश्रांत भारती यांनी सांगितले. दरम्यान, नरेंद्र यांचे काका ॲड. बळवंतराव जाधव म्हणाले, लातूर-अंबाजोगाई मार्गावर कारने मयूरबन कॉलनीकडे वळण घेतले. त्यापूर्वी एक कार निघून गेली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाकडून बुलेटवरून येताना ही दुर्घटना घडली.

दुचाकीचा चक्काचूर; तासाभरात चालक ताब्यात...
या अपघात दुचाकीचा समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी अंधार असल्यामुळे सीसीटीव्हीमध्ये नेमका अपघात कसा झाला, हे अद्यापि समजलेले नाही, असे पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले. अपघातातील कार (एमएच २४ बीएक्स ९९९०) आणि चालकाला तासाभरात ताब्यात घेतले.

नहुष भाजपाचा पदाधिकारी...
नहुषचे आई-वडील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. वडील राहुल पाटील हे भाजपाचे पदाधिकारी तर आई शितल माजी जि.प. सदस्य आणि सास्तूरच्या विद्यमान सरपंच आहेत. नहुष शिक्षणाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून लातूरमध्ये आहेत. त्यांचे शालेय शिक्षण संत तुकाराम शाळेत झाले असून, त्यांनी एमआयटी पुणे येथून पदवी शिक्षण पूर्ण केले होते. नहुष सध्या भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर जखमी नरेंद्र जाधव हे शिंदे सेनाचे युवा पदाधिकारी आहेत.

सास्तूरमध्ये अंत्यसंस्कार...
अपघातातील नहुष पाटील यांच्यावर सास्तूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. लोहारा तालुका, सास्तूर परिसरातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तत्पूर्वी निधनाची वार्ता कळताच गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

Web Title: A young man returning from the gym was hit by a car; Car-motorcycle collision in Latur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात