मराठा आरक्षण लढ्यातील आंदाेलक तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू घाेगरेंचे टाकळगाव शाेकाकूल : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 00:00 IST2025-08-30T23:59:18+5:302025-08-31T00:00:39+5:30
लातूर जिल्ह्यातील घाेगरेंचे टाकळगाव (ता. अहमदपूर) येथील मराठा आरक्षण लढ्यातील आंदाेलक ३५ वर्षीय तरुण विजयकुमार चंद्रकांत घाेगरे यांना मुंबई येथे आझाद मैदानावर शनिवारी सकाळी १०.३० वाजता हृदयविकाराचा झटका आला.

मराठा आरक्षण लढ्यातील आंदाेलक तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू घाेगरेंचे टाकळगाव शाेकाकूल : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा
अहमदपूर/ किनगाव : लातूर जिल्ह्यातील घाेगरेंचे टाकळगाव (ता. अहमदपूर) येथील मराठा आरक्षण लढ्यातील आंदाेलक ३५ वर्षीय तरुण विजयकुमार चंद्रकांत घाेगरे यांना मुंबई येथे आझाद मैदानावर शनिवारी सकाळी १०.३० वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यातच विजयकुमार यांची प्राणज्याेत मालवली. ही वार्ता समजताच गावावर शाेककळा पसरली.
घाेगरेंचे टाकळगाव येथून दाेन टेम्पाेद्वारे ४० तरुण मुंबईतील आंदाेलनासाठी गेले हाेते. ज्या-ज्या वेळी मराठा आरक्षण लढ्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले, त्यावेळी टाकळगावातील विजयकुमार यांनी पुढाकार घेतला हाेता. ते स्वत: वाहनचालक हाेते. तरुणांना संघटित करून आंदाेलनासाठी ते पुढे असायचे. दरम्यान शनिवारी आंदाेलनात असताना विजयकुमार यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयाकडे नेण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्यांची प्राणज्याेत मालवली. तिथे शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव घेऊन गावकरी टाकळगावकडे निघाले आहेत. विजयकुमार यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार हाेणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात वडील चंद्रकांत, आई मीराबाई, पत्नी अंजली, दाेन लहान मुले आहेत. माेठा मुलगा माऊली तिसऱ्या वर्गात शिकताे तर छाेटा अविराज हा अंगणवाडीत शिकताे.
अल्पभूधारक शेतकरी कुटुंब...
दिवंगत विजयकुमार यांचे वडील चंद्रकांत घाेगरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. विजयकुमार यांनी आपले बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून उदरनिर्वाहासाठी वाहन चालविण्याचा व्यवसाय सुरू केला हाेता. सध्या कुटुंबातील ते एकमेव कमावते हाेते. यापूर्वीच्या प्रत्येक आंदाेलनाच्यावेळी त्यांनी पुढाकार घेतला हाेता.