जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: April 12, 2025 05:33 IST2025-04-12T05:32:39+5:302025-04-12T05:33:15+5:30
Latur News: लातूर-मुरुड महामार्गालगत एका वीटभट्टीवर जुनी ओळख म्हणून बाेरगाव काळे येथे जपून ठेवलेल्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. गावात दिमाखात उभी असलेली ट्रकची ओळख आता नाहीशी झाली आहे.

जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना
- राजकुमार जाेंधळे
बोरगाव काळे (जि. लातूर) - लातूर-मुरुड महामार्गालगत एका वीटभट्टीवर जुनी ओळख म्हणून बाेरगाव काळे येथे जपून ठेवलेल्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. गावात दिमाखात उभी असलेली ट्रकची ओळख आता नाहीशी झाली आहे.
बोरगाव काळे येथे गोकुळदास मथुरादास राठी यांची लातूर-मुरुड महामार्गालगत सहा एकरावर वीटभट्टी आहे. हा व्यवसाय ते ४० वर्षांपासून करतात. त्यावेळी त्यांच्याकडे वीटभट्टीच्या कामासाठी जुन्या रॉकेट नावाने ओळख असलेले दहा ट्रक होते. त्यातील पहिला ट्रक (एम.पी.डब्लू २३०३) मॉडेल १९६३ हा ट्रक होता. २६ वर्षापूर्वी वीटभट्टी बंद पडल्याने गोकुळदास राठी यांनी दालमिल, आडत दुकान, होलसेल किराणा दुकान या व्यवसायामध्ये जम बसविला. कालांतराने वीटभट्टीसाठी घेतलेले काही ट्रक त्यांनी विक्रीसाठी काढले हाेते. मात्र, पहिला ट्रक जुनी ओळख म्हणून त्यांनी विक्री न करता वीटभट्टीवरच गत २५ वर्षांपासून जपून ठेवला हाेता. हाच ट्रक शुक्रवारी सायंकाळी पेट घेतल्याने जळून खाक झाला.
आमचा पहिला ट्रक; ओळख नाहीशी झाली...
आमच्या घरात घेतलेले पहिले वाहन हा ट्रकच होता. त्यामुळे आम्ही जुनी ओळख म्हणून या ट्रकला वीटभट्टीवर शेड उभारून त्यामध्ये ठेवणार होतो. मात्र, शुक्रवारी ट्रकने अचानक पेट घेतल्याने आमची जुनी ओळख आज नाहीशी झाली आहे. - धीरज गोकुळदास राठी.
घटना उशिरा कळाली आणि ट्रक झाला खाक...
गावालगत असलेल्या वीटभट्टीवरील जुन्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी पेट घेतला. ही घटना उशिरा कळाली. अग्निशामक दलाला फोन केला होता. मात्र, घटनास्थळी बंब दाखल हाेईपर्यंत ट्रक पूर्णत: जळून खाक झाला होता. - दीपक काळे, माजी चेअरमन.