लातुरात ट्रक चालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By राजकुमार जोंधळे | Updated: March 9, 2023 17:23 IST2023-03-09T17:23:31+5:302023-03-09T17:23:46+5:30
काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. घरातही कोणाशी फारसे बोलत नव्हता.

लातुरात ट्रक चालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लातूर : शहरातील बदाडे नगर येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय ट्रक चालकाने रिंगरोड लगतच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सिध्दांत शिवजी सांगलीकर असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, मयत सिद्धांत सांगलीकर याचे सात-आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सध्यला पत्नी माहेरीच राहत असून, तो ट्रक चालक असल्याने सतत घराबाहेर असायचा. अलीकडे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता. तो घरातही कोणाशी फारसे बोलत नव्हता. यातूनच अलीकडे व्यसनाच्या आहारी गेला होता. सकाळी घरातून बाहेर पडला. त्याने रिंगरोड परिसरात एका शेतात विहिरीलगत लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, सालगडी उसाला पाणी देण्यासाठी तेथे मोटर चालू करायला गेला. त्यावेळी झाडाला मृतदेह लटकल्याचे आढळून आले. याची माहिती त्याने शेतमालक प्रदीप स्वामी यांना दिली. घटनास्थळी गांधी चौक पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीशैल्य कोळे करत आहेत.