१९ हजारांची चाेरी करणारा चाेरटा १८ वर्षांनंतर अडकला जाळ्यात! पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 20:54 IST2025-08-26T20:52:41+5:302025-08-26T20:54:47+5:30

लातुरात गांधी चाैक ठाण्याची कारवाई : गुंगारा देणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

A thief who stole Rs 19,000 was caught after 18 years! Police take major action | १९ हजारांची चाेरी करणारा चाेरटा १८ वर्षांनंतर अडकला जाळ्यात! पोलिसांची मोठी कारवाई

१९ हजारांची चाेरी करणारा चाेरटा १८ वर्षांनंतर अडकला जाळ्यात! पोलिसांची मोठी कारवाई

लातूर शहरातील राम गल्लीतील एकाचे दुकान फाेडून १९ हजारांची चाेरी करणाऱ्या पसार आराेपीच्या मुसक्या तब्बल १८ वर्षांनंतर गांधी चाैक पोलिस ठाण्याच्या पाेलिसांनी कर्नाटक राज्यात मंगळवारी आवळल्या. त्याला कमालनगर (जि. बिदर) येथून उचलण्यात आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अभिजित सुधाकरराव माचिले (३०, रा. राम गल्ली, लातूर) यांचे २४ आणि २५ ऑक्टाेबर २००७ दरम्यान नटराज टॉकीज कॉम्प्लेक्समधील अलका मॅचिंग, कॉस्मेटीकचे दुकान फाेडले हाेते. यावेळी गल्ल्यातील १९ हजार ५०० रुपये चोरून नेले. याबाबत गांधी चौक ठाण्यात गुरनं. २२५/२००७ कलम ४५७, ३८० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. गुन्हा घडल्यापासून आराेपी पाेलिस आणि न्यायालयाला गुंगारा देत हाेता. ताे सतत वास्तव्याचे ठिकाण बदलत पाेलिसांना चकवा देत होता. ओमकार जगन्नाथ सोलापुरे (३८, रा. कमालनगर, जि. बिदर, कर्नाटक) हा कमालनगरमध्ये असल्याची माहिती खबऱ्याने पोह. दत्तात्रय शिंदे यांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आराेपी ओमकार साेलापुरे याला राहत्या घरातून उचलण्यात आले. त्याच्या मुसक्या आवळत मंगळवारी लातूर न्यायालयासमाेर हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील रेजितवाड, सफौ. संपत कांदे, पोह. दत्तात्रय शिंदे, पोह. मुकेश सूर्यवंशी यांनी केली आहे.

Web Title: A thief who stole Rs 19,000 was caught after 18 years! Police take major action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.