उदगीर-लातूर मार्गावर लालपरीने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 05:25 IST2025-07-12T05:24:59+5:302025-07-12T05:25:14+5:30
अपघातातील तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नळेगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस कर्मचारी योगेश मरपले यांनी दिली.

उदगीर-लातूर मार्गावर लालपरीने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार
राजकुमार जाेंधळे/बाबूराव बोरोळे
लातूर - लातूरकडून उदगीरकडे मार्गस्थ झालेल्या स्वारगेट-उदगीर या बसने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला चिरडल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पवन निवृत्ती गायकवाड (वय ४२ रा. डिग्रस ता. उदगीर) असे अपघातातील मयत तरुणाचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, स्वारगेट ते उदगीर लालपरी बस (एम.एच. १४ एल.एक्स ७६५१) शुक्रवारी सायंकाळी लातूरहून उदगीरकडे येत हाेती. दरम्यान, डिग्रसकडून बोळेगावकडे जाणाऱ्या दुचाकीला (एम.एच. २४ क्यू. २८०५) भरधाव लालपरी बसने चिरडले. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास येरोळमोडनजीक घडली. घटनास्थळी चाकूर येथील ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पंचानामा केला. अपघातातील तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नळेगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस कर्मचारी योगेश मरपले यांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ येथील पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठलराव दराडे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. अपघातामुळे काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली हाेती. पाेलिसांनी ती पूर्ववत केली. मृत पवन गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.